रिसॉर्ट चालकाची गळफास घेऊन आत्महत्या. कोलारा परिसरातील घटना..
बातमी सम्राट | समीर बल्की | तालुका प्रतिनिधी चिमूर | दि.२५/०९/२६/
जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा परिसरात रिसॉर्ट संचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुणाल जयंत पटेल (वय ४२), रा. नवसारी, गुजरात असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कुणाल पटेल हे कोलारा (तु.) येथील जंगल मेडो रिसॉर्टचे संचालक असून ते प्रख्यात फोटोग्राफर म्हणूनही परिचित होते.
मागील सुमारे १५ वर्षांपासून ते कोलारा परिसरात रिसॉर्ट व्यवसाय करीत होते. ताडोबा परिसरातील वन्यजीव आणि निसर्ग छायाचित्रणाच्या क्षेत्रातही त्यांचा परिचय होता. बुधवारी सकाळी त्यांच्या बहिणीने त्यांना वारंवार फोन करूनही ते फोन उचलत नसल्याने तिने रिसॉर्ट मधील नोकरला कुणाल फोन उचलत नसल्याची माहिती दिली तेव्हा नोकराने त्याच्या कमऱ्याकडे जाऊन बघितले असता, त्या कम-याचा आतून दरवाजा बंद दिसला. काही प्रयत्नानंतर दरवाजा उघडला गेला असता कुणाल चा मृतदेह फाशी लटकलेल्या अवस्थेत त्याला दिसला. त्याने याची माहिती सर्वत्र दिली असता सर्वजण घटनास्थळी एकत्र जमा झाले. त्यांच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर कोलारा परिसरात खळबळ उडाली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून त्याचा मृत्यदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आला. पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे हे करीत आहेत. या घटनेमुळे ताडोबा पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक व स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.








