दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज बाबत क्रूर थट्टा
नादुरुस्त रोहित्रे महिनोन्महिने बंद; आ. भीमराव केराम यांचा महावितरणच्या कारभारावर संताप !
| किनवट तालुका प्रतिनिधी | मार्कंडेय सिरमवार | दि. २५/०९/२६/
किनवट–माहूर : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपडत असताना किनवट–माहूर परिसरातील अनेक नादुरुस्त रोहित्रे महिनोन्महिने दुरुस्त होऊन मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
पिकांना पाण्याची नितांत गरज असताना वीजपुरवठा खंडित राहणे ही शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालणारी बाब आहे. महावितरणच्या या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा होत असल्याचा संताप आ. भीमराव केराम यांनी व्यक्त केला.
नादुरुस्त रोहित्रे तातडीने उपलब्ध करून देण्याऐवजी विलंब करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी. कामचुकारपणा आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आ. केराम यांनी केली.
“शेतकऱ्यांच्या पिकांशी आणि त्यांच्या उदरनिर्वाहाशी खेळ सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत नादुरुस्त रोहित्रे जलदगतीने बसवून किनवट–माहूर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर नेऊन पुढील कार्यवाही करावी लागेल, असेही आ. केराम यांनी स्पष्ट केले.








