भोकर पुरवठा विभागात चाललंय तरी काय ?
धान्य वाटप, प्रलंबित संचिका आणि ‘खासगी’ माणसांच्या हस्तक्षेपाची चौकशी करा; माधव मेकेवाड आक्रमक !
बातमी सम्राट | मार्कंडेय सिरामवार | किनवट तालुका प्रतिनिधी | दि.२५/०९/२६/
भोकर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या विभागातील सावळागोंधळ आणि अनियमिततेची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी लावून धरण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते माधव नरसिंग मेकेवाड यांनी जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि भोकर तहसीलदारांकडे २१ सप्टेंबर २०२६ रोजी एक खळबळजनक निवेदन देऊन पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराच्या संशयाची होळी पेटवली आहे.
प्रमुख मागण्या:-
धान्य वाटप व ‘आनंदाचा शिधा’चा हिशोब द्या: सन २०२३ ते २०२६ या कालावधीतील रास्त भाव दुकानांचे मासिक चलन, स्टॉक रजिस्टर, धान्य वितरणाच्या नोंदी, तसेच अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, दिव्यांग आणि शेतकरी लाभार्थ्यांची गावनिहाय आकडेवारी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘आनंदाचा शिधा’ योजनेचे संच नक्की कोणाला आणि कसे वाटले, याचा पर्दाफाश करण्याची मागणी निवेदनात आहे.
शासकीय खुर्चीत ‘खासगी’ माणूस कोणाच्या आशीर्वादाने?
पुरवठा विभागातील ‘पेसकार’च्या टेबलवर बाहेरील आणि खासगी व्यक्ती शासकीय कामकाज करताना आढळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शासकीय कार्यालयात अशा व्यक्तींना बसण्याची परवानगी कोणी दिली? असा थेट सवाल उपस्थित करत, अधून-मधून ऑपरेटर म्हणून काम पाहणारे योगेश यल्लाप्पा गुंडेवार (रा. हिमायतनगर) यांच्या नियुक्ती आदेशाची आणि मानधनाची छायांकित प्रत सादर करण्याचे आव्हान प्रशासनाला दिले आहे.
दोन वर्षांपासून संचिका धुळखात!
नवीन, विभक्त व दुय्यम शिधा पत्रिकांचे शेकडो अर्ज मागील दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. ज्या नागरिकांनी नियमानुसार चलने भरली आहेत, त्यांची कामे का अडवली गेली? अर्जदारांचे नाव, अर्ज तारीख आणि प्रलंबिततेचे कारण जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दोषींवर कडक कारवाईची मागणी:
रास्त भाव दुकानांची तपासणी करून आढळलेल्या अनियमितता, देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसा आणि नागरिकांच्या तक्रारींवर काय कारवाई झाली? याचा सविस्तर अहवाल देण्याची मागणी करत, शासकीय अभिलेखांची पडताळणी करून दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी माधव मेकेवाड यांनी केली आहे.








