हॉटेल वरील वेश्या व्यवसायावर छापा…
– कुलदीप गायकवाड | मराठवाडा विभागीय प्रतिनिधी |
माजलगाव, दि. २८: तालुक्यातील लोणगाव येथील गोदावरी तांडा परिसरातील ‘हॉटेल जुगाड’वर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांना सोमवारी (दि. २८) हॉटेल जुगाड येथे महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने डमी ग्राहक व पंचांच्या मदतीने सापळा रचला. डमी ग्राहकामार्फत खात्री केली असता, एका महिलेने वेश्या व्यवसायासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर ठरलेल्या इशाऱ्यानुसार पोलिसांनी छापा टाकून पैसे स्वीकारणाऱ्या संतोष तुकाराम चव्हाण (वय ३६, रा. गोदावरी तांडा, लोणगाव) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून डमी ग्राहकाने दिलेल्या ५०० रुपयांच्या दोन नोटा जप्त करण्यात आल्या. यावेळी एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून ५,५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच खोलीची झडती घेतली असता दहा न वापरलेले निरोध आढळून आले. पोलिसांनी पीडित महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, आरोपी ग्राहकाकडून एक हजार रुपये घेत असून त्यातील ५०० रुपये तिला देऊन वेश्या व्यवसाय करण्यास लावत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पीडित महिलेची सुटका करण्यात आली. या प्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई) चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक (बीड) समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. जनाबाई सांगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक उषा चौरे तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.








