समीर बल्की तालुका प्रतिनिधी
चिमूर: वरोरा व भद्रावती तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असल्याच्या तक्रारी असलेल्या सट्टा-मटका व्यवसाय, प्रतिबंधित गुटख्याची विक्री व साठवणूक तसेच अवैध दारूविक्रीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या अवैध व्यवसायांमुळे तरुण पिढीचे नुकसान होत असून सामाजिक वातावरण व कायदा-सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याने वरोरा व भद्रावती तालुक्यात स्वतंत्र पथक नेमून अचानक तपासणी व छापेमारी मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, पुरवठादार व संपूर्ण नेटवर्कचा शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच स्थानिक पातळीवर दुर्लक्ष किंवा संगनमत होत असल्यास त्याचीही वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तक्रारीवर तातडीने कारवाई करून करण्यात आलेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्यात यावा तसेच तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
हे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. भास्करभाऊ ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपजिल्हाप्रमुख वरोरा-भद्रावती श्री. अमित भारतराव निब्रड यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
यावेळी श्री. बंडुजी डाखरे, विधानसभा प्रमुख; श्री. अतुल नांदे, वरोरा शहरप्रमुख, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
प्रशासनाने या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष देऊन ठोस कारवाई करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
— शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वरोरा-भद्रावती








