दिवसाढवळ्या वाघाचा बैलावर हल्ला..
किनवट परिसरात दहशत
शनिवार पेठ शिवारातील घटनेने शेतकरी भयभीत वाघाला जेरबंद करून नुकसानभरपाई देण्याची मागणी.
किनवट तालुका प्रतिनिधी | मार्कंडेय सिरमवार
किनवट शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शनिवार पेठ शिवारात दिवसाढवळ्या वाघाने शेतात चरत असलेल्या बैलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संजय स्वामी यांच्या शेतात बैल चरत असताना अचानक वाघाने त्याच्यावर झडप घातली. या हल्ल्यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या मानवी वस्तीच्या जवळच हिंस्र प्राण्याने केलेल्या या हल्ल्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर आता नागरी वस्त्यांच्या दिशेने वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच शेतकरी आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी, मजूर तसेच गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, लहान मुले व महिलांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
वाघाचा तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करावे, तसेच हल्ल्यात बैल गमावलेल्या शेतकरी संजय स्वामी यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.
वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी, वाघाच्या हालचालींचा माग काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








