देगलूर जिल्ह्यासाठी पत्रकार संरक्षण समिती आक्रमक; ५ तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी
देगलूर तालुका प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय विभाजन करून देगलूर येथे स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी देगलूर पत्रकार संरक्षण समिती, तालुका अध्यक्ष गजानन टेकाळे यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी त्रिनेत्र प्रबोधन संपादक प्रभु रामलू वंकलवार, कार्यकारी संपादक,गजानन मारोती शिंदे,125-STO News संपादक सुनिल शंकरराव मदनुरे,जयप्रकाश मारोतीराव जाधव उपस्थित होते त्यावेळी
नांदेड जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने दक्षिण नांदेडमधील देगलूर, धर्माबाद, बिलोली, नायगाव आणि मुखेड या पाच तालुक्यांतील नागरिकांना जिल्हास्तरीय शासकीय कामांसाठी नांदेड येथे जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम खर्च होत असून प्रशासकीय कामांमध्ये अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
देगलूर हे दक्षिण नांदेडमधील महत्त्वाचे व्यापारी व बाजारपेठेचे केंद्र असून कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेलगतचे महत्त्वाचे शहर आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र जिल्हा झाल्यास प्रशासन नागरिकांच्या अधिक जवळ येऊन व्यापार, शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळू शकते, असा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय विभाजन करून देगलूर येथे स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा.
प्रस्तावित देगलूर जिल्ह्यात देगलूर, धर्माबाद, बिलोली, नायगाव व मुखेड या पाच तालुक्यांचा समावेश करावा.
सीमावर्ती भागाच्या विकासासाठी विशेष विकास आराखडा तयार करावा.
जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, आरोग्य, शिक्षण, कृषी व समाजकल्याण आदी जिल्हास्तरीय कार्यालये स्थापन करावीत.
जिल्हा निर्मितीची व्यवहार्यता तपासण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करावी.
पाचही तालुक्यांतील नागरिकांची जनसुनावणी घेऊन लोकमत जाणून घ्यावे.
देगलूर जिल्हा निर्मितीच्या मागणीची दखल घेऊन प्रशासकीय प्रक्रिया सुरू करावी आणि प्रस्ताव राज्य शासनाकडे शिफारसीसह पाठवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“देगलूर जिल्हा करा – सीमावर्ती भागाच्या विकासाला नवी दिशा द्या!” असा नारा देत ही मागणी पुढे करण्यात आली आहे.








