देऊळगावराजा, कव्वालीच्या कार्यक्रमानंतर दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री देऊळगावराजा शहरात घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनवर शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित कार्यकर्ता आरिफ शेख यांचा समावेश असल्याचे समजते. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शहरात आयोजित कव्वाली कार्यक्रमादरम्यान काही कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. कार्यक्रम संपल्यानंतर या वादाला अधिक उग्र स्वरूप आले. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आल्याने हाणामारी झाली. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या परिसरातच दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. लहान मुलांच्या भांडणातून या वादाची सुरुवात झाल्याची चर्चा असून, पूर्वीपासून त्यातून असलेला वाद उफाळून आल्याचेही बोलले जात आहे. मात्र, हाणामारीमागील नेमके कारण अद्याप
अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये नगरसेवक अनवर शेख आणि आरिफ शेख यांचा समावेश असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. दरम्यान, दोन जणांच्या मृत्यूमुळे देऊळगावराजा शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. घटनेतील सहभागी व्यक्ती, हाणामारीचे नेमके कारण आणि आरोपींबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.








