भुसावळ प्रतिनिधी : चक्रधर महाले
भुसावळ तालुका शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केला असून,त्या अनुषंगाने महसूल व कृषी, ग्रामविकास विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पंचनामा प्रत्येक पिकांचा करावयाचा आहे. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहता कामा नये,याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.पंचनाम्या सोबत सातबारा उतारा,खाते उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर आयडी,व जिओ टॅग फोटो हे सर्व कागदपत्रके शेतकऱ्याकडून घेण्यात येत आहेत.सामायिक किंवा संयुक्त खातेदार असल्यास याबाबत संमतीपत्र स्वतंत्र द्यावे लागत आहे. या लादण्यात आलेल्या जाचक अटींमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. पिके पूर्णपणे जळून खाक झाली असल्याने पंचनाम्याचे सोपस्कार न करता दुष्काळग्रस्तांना त्वरित सरसकट आर्थिक मदत द्यावी. अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पंचनामेसाठी शेतकऱ्याला स्वतः शेतात उपस्थित राहून ॲपवर फोटो काढण्याची अट घालण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना आपले दैनंदिन काम सोडून शेतात जावे लागत असून, यात त्यांचे एक ते दोन दिवस वाया जात आहेत. अनेक शेतकरी कामानिमित्त किंवा वैद्यकीय कारणास्तव बाहेरगावी असल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे या अट शिथिल करून सरसकट पंचनामे करण्यात यावे. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.








