राहुरी : राहुरी तालुक्यातील नावाजलेल्या म्हैसगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुजाता अरुण पवार यांना अतिक्रमणाच्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले होते. या निर्णयाविरोधात पवार यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले आहे. मात्र, आयुक्तांकडूनही अद्याप त्यांना स्थगिती मिळालेली नसल्याचे समजते.

दरम्यान, पवार यांनी आयुक्तांकडे विनंती अर्ज करून, संबंधित मिळकतीची मोजणी करून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अपीलवर निर्णय द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी मोजणीसाठी आवश्यक शुल्क भरून गट क्रमांक १, २ व ३७१ यांची मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.
मात्र, नुकत्याच झालेल्या मोजणी प्रक्रियेवर गावातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोजणीदरम्यान गट क्रमांक २ चे अपेक्षित मोजमाप करण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित अतिक्रमण गट क्रमांक २ च्या पूर्वेकडील बाजूस जाणाऱ्या ओढ्यात असल्याचे सांगितले जात असून, अतिक्रमण नेमके निश्चित करण्यासाठी चारही बाजूंच्या संबंधित गट क्रमांकांची मोजणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यापूर्वी उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष अतिक्रमणाच्या जागेची चारही बाजूंनी मोजणी करून पंचनामा व अहवाल सादर केला होता. त्यामुळे यावेळच्या मोजणी प्रक्रियेत सर्व संबंधित बाजूंचे मोजमाप का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
तसेच, यावेळी समोरील अर्जदाराला मोजणीची पूर्वसूचना किंवा नोटीस देण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे सदर मोजणी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात असल्याची प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
आता आयुक्तांकडे सादर होणाऱ्या मोजणी अहवालात नेमके काय निष्पन्न होते आणि त्यानंतर अपात्रतेच्या प्रकरणात काय निर्णय घेतला जातो, याकडे म्हैसगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








