संगमनेर : राज्य सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला असतानाही पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जात असल्याच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सरकारने परीक्षा शुल्क माफीचा निर्णय जाहीर करूनही विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले जात असल्याने पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहे का? असा संतप्त सवाल छात्रभारती विद्यार्थी संघटनेने उपस्थित केला.
या आंदोलनानंतर पुणे विद्यापीठाचे संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग, डॉ. राजेंद्र तलवारे यांनी छात्रभारतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरायचे नाही. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षा अर्ज भरून तो महाविद्यालयात जमा करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांचे शुल्क परत केले जाईल, असे आश्वासनही डॉ. तलवारे यांनी दिले. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा अर्ज भरलेला नाही, त्यांनी कोणतेही परीक्षा शुल्क न भरता केवळ अर्ज भरून महाविद्यालयात जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर, अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक विभागातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरू नये. एखाद्या महाविद्यालयाकडून परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षा अर्ज स्वीकारला जात असेल, तर संबंधित विद्यार्थ्यांनी तात्काळ छात्रभारती विद्यार्थी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन छात्रभारतीने केले आहे.
डॉ. राजेंद्र तलवारे यांनी आज बैठक घेऊन संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात येतील, असेही सांगितले.
“दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही आणि ज्यांनी शुल्क भरले आहे त्यांचे शुल्क परत केले जाईल,” या आश्वासनानंतर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने रस्ता रोको आंदोलन मागे घेतले.
यावेळी छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिकेत घुले, राज्य सदस्य मोहम्मद कैफ तांबोळी , राहुल जर्हाड अभिषेक वैराळ ,अनिकेत खरात, सोहम घुले, सुहानी वाघमारे , प्रणाली फटांगरे यांच्यासह छात्रभारतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी छात्रभारतीचा लढा सुरूच राहणार असून, कोणत्याही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारल्यास त्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छात्रभारती विद्यार्थी संघटनेने दिला आहे.








