राहुरी:येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेचा मल्ल पै. तुषार कैलास रणसिंग याने शालेय कुस्ती स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन करत थेट राज्यस्तरावर धडक मारली आहे. ६५ किलो वजन गटात (ग्रीको रोमन पद्धत) तुषारने तालुका आणि जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत प्रवेश केला होता.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर आणि अभिनय इंग्लिश स्कूल, वाशिंबे (ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व ६ ऑक्टोबर रोजी पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतही तुषारने आपल्या उत्कृष्ट तंत्राच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत ६५ किलो ग्रीको रोमन गटात प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या सुवर्ण यशासह त्याची आता राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तुषारला शाळेचे क्रीडा शिक्षक पंकज जगताप व मनोज सुपेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तालुका, जिल्हा आणि विभाग अशा तिन्ही स्तरांवर अजिंक्यपद मिळवल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा प्रभावतीताई बिहाणी, सचिव मनोजशेठ बिहाणी, सहसचिव अनुपशेठ बिहाणी, राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक राहुल जगताप, ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब गुंजाळ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तुषारचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले आणि राज्यस्तरीय स्पर्धेतील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








