खामगाव : दिनांक ७ऑक्टोबर २०२६ रोजी खामगाव शहरातील बडे प्लॉट परिसरातील जुना कब्रस्तान येथील संरक्षण भिंत तुटल्यामुळे परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भिंत तुटलेल्या ठिकाणाहून नागरिकांसह मोकाट जनावरे व कुत्र्यांचा मुक्त वावर वाढला असून, कब्रस्तान परिसरात अस्वच्छता निर्माण होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.
तुटलेल्या भिंतीचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्ती कब्रस्तानात घरातील कचरा टाकत असल्याचे, तसेच काही ठिकाणी मद्यपान, पत्ते खेळणे आणि अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी काही व्यक्तींचा वावर वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरातील शांतता व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून, भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे, संरक्षण भिंत तुटल्यामुळे मोकाट जनावरे व कुत्रे कब्रस्तानात प्रवेश करत आहेत. त्यांच्या मुक्त वावरामुळे कबरींचे नुकसान होण्याची तसेच कबरींची विटंबना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे धार्मिक स्थळाची पवित्रता आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नगरपालिकेने तातडीने दखल घ्यावी.
बडे प्लॉट परिसरातील नागरिकांनी खामगाव नगर परिषद तसेच संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन तुटलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली आहे. तसेच भिंतीचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठिकाणी तात्पुरती सुरक्षा व्यवस्था करावी, नियमित स्वच्छता करावी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी गस्त वाढवावी, अशीही मागणी होत आहे.
कब्रस्तान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था करणे आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे यासारख्या उपाययोजना केल्यास समस्या नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
“संरक्षण भिंत तुटल्यामुळे कब्रस्तानाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. प्रशासनाने विलंब न करता भिंतीचे बांधकाम सुरू करून परिसराची स्वच्छता व सुरक्षितता कायम ठेवावी,” अशी मागणी बडे प्लॉट परिसरातील नागरिकांनी केली आहे.








