राहाता प्रतिनिधी : रोहित जोशी
राहता तालुक्यातील कोल्हार येथील बेलापूर चौकात रात्रीच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील डोरले हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांपैकी एकाला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले. दुसरा संशयित गर्दीचा फायदा घेत पसार झाला. पकडलेल्या संशयिताला काही ग्रामस्थांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला; मात्र वेळीच मध्यस्थी करून त्याला लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बेलापूर चौक परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास भाजीपाला व्यावसायिक शोभा प्रविण देशमाने या आपल्या सासूसोबत घराकडे जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन संशयितांनी त्यांच्या गळ्यातील डोरले हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. डोरले हिसकावल्यानंतर दोघांनी मोटारसायकलवरून बेलापूर चौकाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शोभा देशमाने व त्यांच्या सासूने आरडाओरड केली. आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी संशयितांचा पाठलाग केला. यावेळी एका संशयिताला पकडण्यात यश आले, तर दुसरा संशयित गर्दीचा फायदा घेत पसार झाला.
संशयिताला पकडल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांचा मोठा जमाव जमा झाला. काही ग्रामस्थांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन संकेत संजय खर्डे यांनी वेळीच मध्यस्थी करत संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर नगरी समाचारचे प्रतिनिधी संजय शिवलेकर यांनी ग्रामस्थांना समजावून सांगत पोलिसांशी संपर्क साधला. पकडलेल्या संशयिताला पुढे लोणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
दरम्यान, ग्रामस्थांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांपैकी एकाला पकडण्यात यश आले. पसार झालेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे कोल्हार-बेलापूर चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र संशयिताला वेळीच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
महिलेच्या आरडाओरडामुळे परिसरातील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावून आले. त्यामुळे चेन स्नॅचिंगचा प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एकाला पकडण्यात यश आले. नागरिकांची सतर्कता आणि वेळीच पोलिसांना माहिती मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.








