राहता तालुका प्रतिनिधी
परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचबरोबर अंत्यविधीसाठी आवश्यक असलेला चारा मिळविण्यासाठीही सर्वसामान्य नागरिकांची मोठी धावपळ होत आहे. अशा परिस्थितीत सावळीविहीर येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक गणेश आगलावे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे.
आगलावे यांनी आपल्या वस्तीवर अंत्यविधीसाठी आवश्यक असलेला चारा जमा करून ठेवला असून, गावातील कोणत्याही कुटुंबात दुःखद प्रसंग ओढवल्यास अंत्यविधीसाठी लागणारा चारा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे दुःखाच्या प्रसंगी चाऱ्यासाठी होणारी नागरिकांची धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.
याबाबत बोलताना गणेश आगलावे म्हणाले, “एखाद्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवल्यानंतर अंत्यविधीच्या वेळी चाऱ्यासाठी नातेवाईक व ग्रामस्थांना वणवण फिरावे लागते. ही परिस्थिती पाहून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या परीने काहीतरी योगदान द्यावे, या उद्देशाने चारा जमा करून ठेवला आहे. गावातील गरजू कुटुंबांना अंत्यविधीसाठी हा चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.”
“या उपक्रमामागे कोणतेही राजकारण नसून केवळ सामाजिक बांधिलकीची भावना आहे. समाजाचे आपल्यावर काही देणे आहे, या भावनेतून हा छोटासा प्रयत्न केला आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहे,” असेही आगलावे यांनी स्पष्ट केले.
दुष्काळसदृश परिस्थितीत नागरिकांच्या अडचणी ओळखून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, संकटाच्या काळात माणुसकीचा हात देणारा हा उपक्रम ठरत आहे.








