शाश्वत शेतीसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल शेतकऱ्यांपर्यंत जाणे गरजेचे– कुलगुरू डॉ. विलास खर्चे
राहुरी प्रतिनिधी : प्रमोद डफळ
राहुरी विद्यापीठ, दि. 8 ऑक्टोबर, 2026 हवामान बदलामुळे पावसातील वाढते खंड, अनिश्चित परतीचा पाऊस आणि उपलब्ध पाण्याच्या मर्यादित स्रोतांमुळे शेतीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाचा प्रत्येक थेंब साठविणे व जमिनीत जिरविणे, मपर ड्रॉप मोअर क्रॉप’ या संकल्पनेनुसार पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, आंतरपीक पद्धतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. विविध शेती घटकांचे एकत्रीकरण करून एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल कृषि विद्यापीठांनी विकसित केलेले असून त्याचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालय, पुणे येथील डॉ. शिरनामे सभागृहात रब्बी व उन्हाळी हंगाम-2026 साठी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संचालक शिक्षण डॉ. साताप्पा खरबडे, कृषि परिषदेचे संचालक संशोधन डॉ. विकास लोंढे, कोल्हापूर विभागाचे कृषि सहसंचालक अजय कुलकर्णी, नाशिक विभागाचे कृषि सहसंचालक रवींद्र माने, पुणे कृषि विभागाचे मोहीम अधिकारी विनायक कदम, पुणे विभागाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय लाड, सोलापूर विभागाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. नितीन रणशूर, राहुरी विभागाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बाळासाहेब पाटील, इगतपुरी विभागाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अविनाश कोळगे उपस्थित होते. कृषि विभागाचे संचालक विस्तार व प्रशिक्षण उदय देशमुख तसेच संचालिका मृदा संवर्धन व पाणलोट क्षेत्र विकास डॉ. मेघना केळकर ऑनलाइन उपस्थित होत्या.
कुलगुरू डॉ. खर्चे पुढे म्हणाले की, हवामान बदलाचे परिणाम आता प्रकर्षाने जाणवत असले तरी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने या आव्हानांचा वेध घेत सुमारे बारा वर्षांपासून संशोधनाला प्राधान्य दिले आहे. यावर्षी विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावरील 11 वाण, राज्यस्तरावरील 11 वाण आणि 82 कृषि तंत्रज्ञानाधारित शिफारशी आणि 4 यंत्रे प्रसारित केले आहेत. ड्रोन तंत्रज्ञानाच्या कृषि क्षेत्रातील वापराबाबतही विद्यापीठाने शिफारशी विकसित केल्या आहेत.सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक निविष्ठांची उपलब्धता आणि त्यांचा योग्य वापर याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यापीठाने विकसित केलेले काटेकोर शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे ही विद्यापीठ आणि कृषि विभागाची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले. कृषि विद्यापीठाने विविध शेतकरी भिमुख विस्तार उपक्रम कृषि विभागाच्या सहकार्याने सुरू केलेले आहेत. यामध्ये फुले कृषि महोत्सव, फुले समृद्ध व्हिलेज, फुले पोकरा संजीवनी व्हिलेज, मकृषि विद्यापीठ शेतकऱ्यांच्या बांधावर’, विविध पिकांचे दिवस आणि शेतकरी महिलांचा सन्मान अशा विविध शेतकरीभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून शेतकरी, शास्त्रज्ञ आणि कृषि अधिकारी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी केला आहे. या संवादातून शेतकऱ्यांच्या समस्या, गरजा आणि अपेक्षा जाणून घेऊन संशोधनाला अधिक शेतकरीकेंद्रित दिशा देता येत असल्याचे कुलगुरूंनी म्हणाले.
यावेळी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी सन 2026 मध्ये कृषि विद्यापीठाने विकसित केलेले नवीन वाण, कृषि अवजारे, यंत्रे आणि विविध तंत्रज्ञानाधारित संशोधन शिफारशींचे सादरीकरण केले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी प्रास्ताविक करून विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण उपक्रमांचा आढावा सादर केला. कोल्हापूर विभागाचे कृषि सहसंचालक अजय कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या संशोधन शिफारशींचा अभ्यास करून त्या शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले. कृषि विभागाकडून तंत्रज्ञान प्रसारासाठी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक विभागाचे कृषि सहसंचालक रवींद्र माने यांनी विद्यापीठाचे संशोधन शेतकरीभिमुख असल्याचे नमूद करत, एल निनोच्या पार्श्वभूमीवर फळबागांचे संरक्षण हे मोठे आव्हान असल्याचे सांगितले. बदलत्या हवामान परिस्थितीत ‘पावसाचा खंड’ या संकल्पनेची व्याख्या नव्याने निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे विभागाचे मोहीम अधिकारी विनायक कदम यांनी कृषि विभागामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पुणे, कोल्हापूर व नाशिक विभागातील कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागांचा संशोधन व विस्तार कार्याचा अहवाल सादर केला व प्रत्याभरण दिले .
बैठकीदरम्यान विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. भरत पाटील यांनी रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन, डॉ. उत्तम कदम यांनी रब्बी पिकांतील किडींचे व्यवस्थापन, डॉ. सुरेश दोडके यांनी हरभरा उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. संजय कोळसे यांनी रब्बी पिकांतील रोग व्यवस्थापन व विद्यापीठ विकसित ‘फुले सुपर बायोमिक्स’, डॉ. विकास लोंढे यांनी हवामान आधारित रब्बी हंगाम नियोजन, डॉ. विजू अमोलिक यांनी रब्बी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. सचिन नलावडे यांनी रब्बी हंगामासाठी विद्यापीठ विकसित सुधारित कृषि अवजारे व यंत्रे, प्रा. भालचंद्र म्हस्के यांनी गहू उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. आनंद जाधव यांनी मृदा व जलसंवर्धन, मृदा आरोग्य व संतुलित खत व्यवस्थापन आणि डॉ. हितेंद्र राजपूत यांनी करडई उत्पादन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध कृषि प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले, तर आभार डॉ. दत्तात्रय लाड आणि डॉ. मृणाल आजोतीकर यांनी मानले.बैठकीस आत्माचे संचालक, विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, कृषि विभागाचे कृषि सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, विभागप्रमुख, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्रांचे प्रमुख शास्त्रज्ञ तसेच कृषि विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








