लाच घेताना तलाठी ACB च्या जाळ्यात! महसूल विभागात खळबळ, इतर कर्मचारी पसार.
बातमी सम्राट | कुलदीप गायकवाड | बीड जिल्हा प्रतिनिधी | दि.०८/१०/२६/
शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे.
केज तालुक्यातील उमरी सज्जाचे तलाठी फलके यांना जमीन महसूल व सातबारा नोंदीच्या कामासाठी आठ हजाराची लाच स्वीकारताना बीड एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई दिनांक ८ ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी केज तहसील कार्यालय परिसरात केली या कारवाईमुळे केज महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच कार्यालयातील काही कर्मचारी पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या जमिनीशी संबंधित शासकीय कामासाठी तलाठी फलके यांनी लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने याबाबत बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तलाठी फलके यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
सहा महिन्यांत लाचखोरांवर कारवायांचा धडाका.
बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांत विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी कर्मचाऱ्यांवर एसीबीने केलेल्या कारवायांमुळे लाचखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. परळीतील महावितरणच्या तंत्रज्ञाकडून तक्रारदाराकडे लाचेची मागणी झाल्यानंतर एसीबीने कारवाई केली. तसेच पाटोदा, गेवराई यांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी शासकीय कामांसाठी लाच मागितल्याच्या तक्रारींवरून कारवाया झाल्या आहेत.
महावितरण, महसूल, बांधकाम व अन्य शासकीय यंत्रणांशी संबंधित कामांसाठी नागरिकांकडून लाचेची मागणी होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी एसीबीकडे दाखल होत आहेत. तक्रारींची पडताळणी करून सापळा रचत एसीबीकडून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले जात आहे. त्यामुळे लाचखोरीविरोधातील कारवायांना जिल्ह्यात वेग आल्याचे चित्र आहे.
कारवाया होऊनही लाचखोरीला आळा का नाही?
एसीबीकडून सातत्याने कारवाया होत असतानाही शासकीय कार्यालयांमध्ये लाच मागितल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांचे शासकीय काम नियमाप्रमाणे आणि पारदर्शकपणे होणे अपेक्षित असताना त्यासाठी आर्थिक मागणी होत असल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची गरज आहे.
केज तहसील कार्यालयातील ताज्या कारवाईमुळे महसूल विभागातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत एसीबीच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.
ही कारवाई डीवायएसपी सोपान चिटमपलले,मच्छिंद्र बिडकर, अमोल खरसाडे, प्रदीप सुरवसे, अंबादास पुरी यांनी केली.
लाच मागितल्यास तक्रार करा.
शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाच देण्याऐवजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन एसीबी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








