राहुरी प्रतिनिधी : प्रमोद डफळ
राहुरी विद्यापीठ, दि. 9 ऑक्टोबर, 2026 महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे शासकीय कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त सेवा संकल्प अभियान 2026 अंतर्गत पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा जोतिबा फुले यांचे जीवन, कार्य व वारसा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयातील 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, शिक्षण संचालक डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अक्षय ऊर्जा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे व स्पर्धेचे समन्वयक कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.गणेश शेळके उपस्थित होते.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरमध्ये महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षण, शेतकरी कल्याण, सामाजिक समतेचे विचार आणि त्यांच्या कार्याचे विविध पैलूंचे दर्शन घडले. यावेळी डॉ. सचिन नलावडे म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आजही समाजाला दिशा देत आहेत. अशा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व सामाजिक जाणीव वाढीस लागते. डॉ. कैलास कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या या स्पर्धेतील सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. विक्रम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलात्मक सादरीकरणाचे कौतुक केले. यावेळी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.








