राहुरी : मातृत्वाची जबाबदारी, कौटुंबिक कर्तव्ये आणि वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाचा कठीण प्रवास यांचा समर्थपणे समतोल साधत सांगली येथील डॉ. मयुरी भाऊसाहेब खेवरे यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS), नाशिक येथील प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र (Obstetrics & Gynaecology) या विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेत महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. मयुरी यांच्या या यशाचे विशेष कौतुक होत आहे. परीक्षेच्या काळात त्यांचा मुलगा पद्मराज अवघ्या सहा महिन्यांचा होता. एका बाजूला बाळाचे संगोपन, मातृत्वाची जबाबदारी आणि कौटुंबिक कर्तव्ये, तर दुसऱ्या बाजूला वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रचंड अभ्यास आणि परीक्षेची तयारी, अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत त्यांनी हे यश संपादन केले. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
आपल्या यशाविषयी भावना व्यक्त करताना डॉ. मयुरी खेवरे म्हणाल्या, “या यशामागे माझ्या गुरुजनांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे आशीर्वाद आणि माझ्या पतीचा मोलाचा पाठिंबा आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच हे यश मिळविणे शक्य झाले.”
त्या पुढे म्हणाल्या, “एक आई, पत्नी आणि डॉक्टर म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळताना मिळालेले हे यश माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. माझ्या या प्रवासात खंबीरपणे साथ देणारा माझा मुलगा पद्मराज आणि पती योगेश सुंबे यांच्याप्रती मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. भविष्यातही वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून रुग्णांची सेवा करण्याची प्रेरणा या यशातून मिळाली आहे.”
डॉ. मयुरी खेवरे या शिवसेनेचे नेते रावसाहेब खेवरे यांच्या पुतणी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल खेवरे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिचितांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मातृत्व आणि करिअर यांचा समतोल साधत यशाचे शिखर गाठणाऱ्या डॉ. मयुरी खेवरे यांची कामगिरी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसह अनेक तरुण डॉक्टर आणि मातांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. जिद्द, मेहनत आणि कुटुंबीयांची साथ यांच्या बळावर कोणतेही आव्हान पेलता येते, हे त्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.









