संगमनेर : महाराष्ट्र राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना एसटी बसपास पूर्णपणे मोफत देण्यात यावा, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन संगमनेर आगार प्रमुख यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक यांना देण्यात आले.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिस्थितीचा परिणाम शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवरही होत आहे. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज करावा लागणारा प्रवासही आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा शुल्क माफ करून पुरेसा दिलासा मिळणार नाही. महाविद्यालयात जाण्यासाठी दररोज एसटी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसपाससाठी पैसे खर्च करावे लागतात. बसपासचे पैसे नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने एसटी बसपासही मोफत करणे आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात केवळ पाच रुपये नसल्यामुळे एका विद्यार्थ्याला एसटी बसमधून उतरवून दिल्याची घटना समोर आली होती. ही घटना विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे वास्तव समोर आणणारी आहे. शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना पैशांअभावी अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
विशेषतः ग्रामीण आणि दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. बसपाससाठी पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना महाविद्यालयात जाणे कठीण होते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर आणि शिक्षणावर होऊ शकतो. आर्थिक अडचणींमुळे मुलींचे उच्च शिक्षणही थांबू नये, यासाठी सरकारने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही, शेतात पिके नाहीत आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबांकडे शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या प्रवासखर्चाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार असून, आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, अशी भूमिका छात्रभारती विद्यार्थी संघटनेने मांडली आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांना एसटी बसपास पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय परिवहन विभागाने तातडीने घ्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांना आपले शिक्षण सुरू ठेवण्यास मदत होईल.
सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नाकडे केवळ परीक्षा शुल्कापुरते मर्यादित न पाहता, शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रवासखर्चाचाही गांभीर्याने विचार करावा आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत एसटी बसपास देण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे.
या वेळी छात्रभारती चे राज्य अध्यक्ष अनिकेत घुले ,राज्य सदस्य मोहम्मद कैफ तांबोळी , अभिषेक वैराळ , अनिकेत खरात , सोहम घुले , आयुष फुलसुंदर ,सुजित फटांगरे , ॐ भागवत ,दत्तात्रय कडनर , साबळे साहिल ,अनेक कार्यकर्ते छात्र भारती चे उपस्थित होते








