संविधान वाचन शाळेच्या माध्यमातून भारतीय संविधान महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणार : संविधान प्रचारक ॲड. नितीन घोडके सर.
संविधान वाचन शाळा ठरणार महाराष्ट्रातील संविधान प्रचाराचे नवे विचारपीठ; राज्यभर उपक्रम राबविण्याचा संकल्प….
सुनिल एच गायकवाड. | पुणे, दि. ११ ऑक्टोबर २०२६ :
भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि लोकशाही या मूलभूत मूल्यांचा प्रसार महाराष्ट्राच्या घराघरात करण्याच्या उद्देशाने महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आणि आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान वाचन शाळेचा शुभारंभ करण्यात आला. रमाईपुत्र विठ्ठल दादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार चळवळीच्या वतीने करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लताताई दयाराम राजगुरू आणि पुणे जिल्हा समन्वयक ॲड. नितीन सर घोडके यांच्या हस्ते महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लताताई राजगुरू होत्या. यानंतर ॲड. नितीन घोडके यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून संविधानातील मूलभूत मूल्यांचे महत्त्व विशद केले.
यावेळी संविधान प्रचारक ॲड. नितीन घोडके म्हणाले, संविधान वाचन शाळा हा केवळ संविधान वाचनाचा उपक्रम नसून संविधानिक विचार, मूल्ये आणि सामाजिक जाणीव समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून हा उपक्रम महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत पोहोचवून भारतीय संविधान महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचविणार आहोत.
संविधान वाचन शाळेच्या माध्यमातून संविधानाचा नियमित अभ्यास, वैचारिक चर्चा आणि संविधानिक मूल्यांची जनजागृती यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. **महाराष्ट्रात संविधान प्रचारासाठी ‘संविधान वाचन शाळा’ हा एक स्वतंत्र आणि व्यापक उपक्रम म्हणून ओळख निर्माण करेल**, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
रमाईपुत्र विठ्ठल दादा गायकवाड यांनी संविधानाच्या सखोल अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. संविधानाची जाण नागरिकांमध्ये अधिकार, कर्तव्ये आणि सामाजिक न्यायाविषयी जागरूकता निर्माण करते. संविधानातील मूल्ये प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. नितीन सर घोडके आणि लताताई दयाराम राजगुरू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच चळवळीशी जोडलेल्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्र महिला प्रमुख रश्मी प्रक्षाळे, महाराष्ट्र युवक प्रतिनिधी प्रशांत देठे, प्रशांत कदम, प्रदीप पैठणकर, समाधान म्हस्के, अमोल रणपिसे, दस्तऐवजीकरण प्रमुख रवी गवळी, हरीश मोहीले, सतीश हातोले, मिलिंद सोनकांबळे, प्रतीक इखारे, ॲड. वर्षा घोडके, स्नेहल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दर महिन्याच्या ७ तारखेला संविधान वाचन कार्यशाळा आयोजित करून संविधानिक मूल्यांचा प्रसार, वैचारिक प्रबोधन आणि सामाजिक जागृती अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.








