आठ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा नळगंगा धरणात जलसमाधी आंदोलन करणार…
शेतकऱ्यांना विनाअट हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांचा सरकारला इशारा
उज्वल जैस्वाल | बुलढाणा | प्रतिनिधी | दि. ११ ऑक्टोबर २०२६
बुलढाणा : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विनाअट हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करून ती दिवाळीपूर्वी खात्यात जमा करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रश्नांवर आझाद हिंद शेतकरी संघटना आणि वारकरी धर्म परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाने आठ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना विनाअट हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी
राज्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने कोणत्याही जाचक अटी न लावता सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी आणि दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच सत्याग्रह आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जागा नियोजित करावी, तसेच जिल्ह्यातील वाढता गुन्हेगारीचा प्रश्न गांभीर्याने घेत क्राइम रेट कमी करण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करावा, अशा विविध मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन
प्रस्तावित जलसमाधी आंदोलनाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, महसूल उपजिल्हाधिकारी गायकवाड आणि उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
आठ दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा आंदोलन अटळ
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवून त्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. सरकारने आठ दिवसांत निर्णय घ्यावा; अन्यथा प्रस्तावित जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी भूमिका संघटनेने मांडली.
आंदोलन करू नका; प्रशासनाकडून चर्चेचे आश्वासन
संघटनेच्या निवेदनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच दिवशी सामूहिक बैठक घेऊन मागण्यांवर चर्चा करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीतील मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील, तर शासनस्तरावरील मागण्यांचा प्रशासकीय दस्तऐवजांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून आवश्यक पत्रव्यवहार करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल, त्यामुळे संघटनेने तूर्तास आंदोलनात्मक भूमिका घेऊ नये, अशी विनंती कव्हळे यांनी शिष्टमंडळाला केली.
शेतकरी जगला तरच राज्य चालेल : वासुदेव महाराज शास्त्री
शासन आणि प्रशासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. शेतकरी जगला तरच देश आणि राज्याची अर्थव्यवस्था टिकेल. त्यामुळे शेतकऱ्यांना जाचक अटी व नियम न लावता सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी आणि ही मदत दिवाळीपूर्वी खात्यात जमा करावी, अशी मागणी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मभूषण ह.भ.प. वासुदेव महाराज शास्त्री यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा सरकारच्या निषेधार्थ जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित
या वेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मभूषण वासुदेव महाराज शास्त्री, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष आशाताई गायकवाड, शाहीर परिषदेच्या जिल्हाध्यक्ष सिंधुताई अहेर, ग्रामस्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, चिखली तालुकाध्यक्ष अशोक बाहेकर, तालुका सचिव गजानन महाराज थीगळे, निलेश हाडे महाराज आदी उपस्थित होते.
आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आठ दिवसांत ठोस निर्णय होतो का, याकडे शेतकरी आणि संबंधित संघटनांचे लक्ष लागले आहे.








