दुष्काळी परिस्थिती, अपुरा पाऊस आणि करपलेल्या पिकांमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता.
मुखेड : तालुक्यातील अंबुलगा महसूल मंडळांतर्गत उंद्री प.दे. येथे यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पीक कापणी प्रयोग यशस्वीरीत्या पार पडले. पीकविमा प्रतिनिधी के. मठवाले व सहायक कृषी अधिकारी व्ही. के. जोशी यांच्या उपस्थितीत अनियमित (रॅंडम) पद्धतीने निवड करण्यात आलेल्या शेतकरी दिगांबर नरसिंग कलेपवार व ज्ञानेश्वर माधवराव वडजे यांच्या शेतात हे प्रयोग घेण्यात आले.
यंदा अपुरा पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिके करपल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनाची अचूक नोंद घेणाऱ्या पीक कापणी प्रयोगांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या उत्पादनाच्या आकडेवारीच्या आधारे संबंधित नियमांनुसार पीक उत्पादकतेचे मूल्यांकन केले जाते. त्यामुळे प्रयोग पारदर्शक व अचूक पद्धतीने होणे आवश्यक असून, दुष्काळी परिस्थितीचे वास्तव उत्पादनाच्या नोंदीत प्रतिबिंबित होणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
यावेळी पीकविमा प्रतिनिधी के. मठवाले, सहायक कृषी अधिकारी व्ही. के. जोशी, सहायक कृषी अधिकारी सुनील श्रंगारे, सहायक अधिकारी अमोल जलधावार, पोलीस पाटील प्रतिनिधी नरसिंग वादे, हणमंत गन्लेवार, मारोती पा. मटके, माजी उपसरपंच बालाजी पा. भोकरे, ज्ञानेश्वर पा. वडजे, नारायण पा. वडजे, शिवाजीराव पंदनवाड, श्रीराम पा. वडजे, निळकंठ कनंजे, परमेश्वर वडजे, बालाजी कनंजे, राम वडजे, उमाकांत सूर्यवंशी, बळीराम पा. कौडगावे, धोंडीबा कौडगावे, गणेश पसारे, ख्वाजा शेख आदी उपस्थित होते.
दुष्काळामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असताना, पीक कापणी प्रयोगातून प्रत्यक्ष उत्पादनाचे वास्तव समोर येऊन पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार पीकविमा भरपाईचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.








