पुणे प्रतिनिधी | एस.एन.नांदेडकर
भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि लोकशाही या मूलभूत मूल्यांचा प्रसार करण्यासाठी महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आणि ‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान वाचन शाळे’चा भव्य शुभारंभ करण्यात आला. रमाईपुत्र विठ्ठल दादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष लताताई दयाराम राजगुरू आणि पुणे जिल्हा समन्वयक ॲड. नितीन सर घोडके यांच्या हस्ते महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर ॲड. नितीन घोडके यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून उपक्रमाचा प्रारंभ केला.
यावेळी बोलताना संविधान प्रचारक ॲड. नितीन घोडके म्हणाले की, संविधान वाचन शाळा हा केवळ वाचनाचा उपक्रम नसून संविधानिक विचार, मूल्ये आणि सामाजिक जाणीव समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे; या चळवळीद्वारे भारतीय संविधान महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले जाईल. संविधानाचा नियमित अभ्यास, वैचारिक चर्चा आणि संविधानिक मूल्यांची जनजागृती करून हा उपक्रम राज्यात संविधान प्रचाराचे एक व्यापक विचारपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच रमाईपुत्र विठ्ठल दादा गायकवाड यांनी संविधानाच्या सखोल अभ्यासाचे महत्त्व विशद करत, नागरिकांमध्ये अधिकार, कर्तव्ये आणि सामाजिक न्यायाची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास महिला प्रमुख रश्मी प्रक्षाळे, प्रशांत देठे, प्रशांत कदम, प्रदीप पैठणकर, समाधान म्हस्के, अमोल रणपिसे, रवी गवळी, हरीश मोहीले, सतीश हातोले, मिलिंद सोनकांबळे, प्रतीक इखारे, ॲड. वर्षा घोडके आणि स्नेहल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सोहळ्यात ॲड. नितीन सर घोडके आणि लताताई दयाराम राजगुरू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच चळवळीच्या प्रतिनिधींचा बहुमान करण्यात आला. सामाजिक जागृती आणि वैचारिक प्रबोधन अधिक व्यापक करण्यासाठी दर महिन्याच्या ७ तारखेला संविधान वाचन कार्यशाळा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प या वेळी सर्वानुमते सोडण्यात आला.








