राहुरी प्रतिनिधी : प्रमोद डफळ
राहुरी विद्यापीठ, दि. 14 ऑक्टोबर, 2026 यावर्षी महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण 50% असल्यामुळे संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकरी बांधवांनी संपूर्णपणे आत्मसात करण्याची गरज आहे. विद्यापीठाने विकसित केलेले हवामान अनुकूल वाण तसेच एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल या दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे आहे. विद्यापीठाच्या या तंत्रज्ञानाबरोबरच शेतकरी बांधवांनी शेळीपालनाची जोड दिली तर नक्कीच आपली शेती शाश्वत व समृद्ध होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागांतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्प (संगमनेरी क्षेत्रीय योजना) यांनी शाश्वत शेळीपालन तंत्रज्ञान या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, शिक्षण संचालक डॉ. साताप्पा खरबडे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. बाळासाहेब पाटील व शेळी सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुनिल अडांगळे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. प्रशांत बोडके मार्गदर्शन करताना म्हणाले की शेळीपालन हा व्यवसाय शेतकरी बांधवांना परवडणारा तसेच सहज करता येणारा आहे. कमी खर्चात, कमी जागेत करता येणारा असा हा शाश्वत शेळीपालन व्यवसाय महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त करणारा असल्याचे ते म्हणाले. डॉ. साताप्पा खरबडे यावेळी म्हणाले की पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर किफायतशीर व्यवसाय असणारा शेळीपालनाचा विचार शेतकरी बांधवांनी करणे गरजेचे आहे. महिलांचे योगदान शेतीमध्ये मोठे आहे. शेतकरी बांधवांनी शेळीपालन व्यवसायाचा विचार करताना एकदम 50 शेळ्यांपासून सुरुवात करण्यापेक्षा 8-10 शेळ्यांपासून सुरुवात करणे योग्य राहील असे यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिनकर कांबळे म्हणाले की अल्पभूधारक, कमी उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेरी शेळी ही स्थानिक जात असून शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त आहे. शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा या प्रशिक्षणामागील उद्देश आहे. ज्ञानवर्धक व शेळीपालनाला योग्य दिशा देणारे हे प्रशिक्षण असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रशिक्षणामध्ये शेळ्यांच्या जातींची निवड, निवास व्यवस्था, आहार व चारा व्यवस्थापन, प्रजनन व पैदास नियोजन, करडांचे संगोपन, रोगप्रतिबंधक उपाययोजना, शेळीच्या दुधाचे महत्त्व, उत्पादन खर्च व उत्पन्नाचे नियोजन आणि बाजारपेठ व्यवस्थापन या बाबींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उल्हास गायकवाड यांनी तर आभार डॉ. सुनिल अडांगळे यांनी मानले. या कार्यक्रमास गो संशोधन व विकास प्रकल्पाचे प्रमुख डॉ. समीर ढगे तसेच विभागाचे डॉ. दिलीप देवकर, मेंढी प्रकल्पाचे प्रमुख डॉ. रवींद्रनाथ निमसे व इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी म्हणुन राहुरी, नेवासा तालुका तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून 45 पेक्षा जास्त संख्येने शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होत्या.









