सेवा संकल्प अभियान 2026 चा समारोप उत्साहात; शास्त्रज्ञांनो गावाकडे चला – कुलगुरू डॉ. विलास खर्चे
राहुरी विद्यापीठ, दि. 17 ऑक्टोबर, 2026 विद्यापीठातील विविध पिकांचे तज्ज्ञ कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन गावांमध्ये जाऊन शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. बदलते हवामान, समस्याग्रस्त जमिनी आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांच्या सुधारित वाणांची लागवड आणि काटेकोर शेती पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीचा खर्च कमी करण्यासाठी शास्त्रज्ञ शास्त्रीय पद्धतीने काम करून योग्य त्या योजना व मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत आहेत. सेवा संकल्प अभियान सोबतच खेत बचाव अभियान यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शेती आणि मातीचे आरोग्य टिकवण्याचे काम केले जात आहे. तरुण पिढीला शेतीचे महत्त्व आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्याची माहिती देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती घडवून आणण्याचे कार्य शास्त्रज्ञ व विद्यापीठ करत आहे. प्रत्येक शास्त्रज्ञाने आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करायला हवा यासाठी शास्त्रज्ञांनो गावाकडे चला असे आवाहन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ व कृषी विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियान- 2026 अंतर्गत फुले समृद्ध गाव तांभेरे येथे शेतकरी- शास्त्रज्ञ -विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तांभेरे गावचे सरपंच डॉ. उमेश मुसमाडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, शिक्षण संचालक डॉ.साताप्पा खरबडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे शासकीय कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक तथा फुले समृद्ध गाव तांभेरेचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, मेजर ताराचंद गागरे, मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भारत पाटील, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय कोळसे,जीव रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश लोखंडे, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. तुळशीदास बाष्टेवाड, तांभेरे गावचे ग्रामसेवक श्री. ओहोळ उपस्थित होते.
यावेळी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रात डॉ. विक्रम कड यांनी महिला बचत गटांसाठी शेतमाला प्रक्रिया उद्योगातील संधी, डॉ. विजयकुमार पाटील यांनी पाणी व्यवस्थापन, डॉ. आनंद जाधव यांनी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, मृदा व सिंचन पाणी परीक्षण व डॉ. विजयकुमार शिंदे यांनी चारा व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.यावेळी मेजर ताराचंद गागरे, श्री. लक्ष्मण गागरे व प्रा. मच्छिंद्र निमसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सदाफळ यांनी शेतकरी- शास्त्रज्ञ- विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. यानंतर फुले समृद्ध गाव फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी मृदा आरोग्यपत्रिकेचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी चिंचविहिरे येथील प्रगतशील शेतकरी महिला निर्मलाताई गाडे यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा. मच्छिंद्र निमसे यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांवरील कवितासंग्रहाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पदव्युत्तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतीविषयक जनजागृतीपर घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन गावातून फेरी काढत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शाश्वत शेतीचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचविला. विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, कृषी संशोधनाची दिशा आणि विद्यापीठाच्या योगदानाची माहिती मिळाल्यास कृषी क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण होऊन भविष्यातील सक्षम कृषी नेतृत्व घडण्यास मदत होईल. या उद्देशानेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. पंडित खर्डे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी तसेच पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व तांभेरे गावातील शेतकरी तसेच महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









