तुंबलेल्या नाल्या, तुटलेले चेंबरचे ढापे आणि रस्त्यालगत अतिक्रमण; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
राहुरी प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
राहुरी : राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, तुंबलेल्या सांडपाण्याच्या नाल्या, चेंबरचे तुटलेले ढापे आणि रस्त्यालगत वाढलेले अतिक्रमण यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये मैलमिश्रित पाणी येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
राहुरी खुर्द परिसरातील अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्या तुंबलेल्या असून, काही ठिकाणी नाल्यांमध्ये दगड-माती टाकल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाल्यांमध्ये मैलमिश्रित पाणी येत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
याशिवाय परिसरातील काही चेंबरचे ढापे तुटलेले असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी चार ते पाच वेळा संबंधित ठिकाणी पाहणी करून गेले, मात्र अद्याप तुटलेल्या चेंबरवरील ढापे बसविण्यात आलेले नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. चेंबर उघडे किंवा असुरक्षित अवस्थेत राहिल्यास पादचारी, दुचाकीस्वार आणि लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. कर्मचारी पाहणी करून जात असताना प्रत्यक्ष दुरुस्ती कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दुसरीकडे, रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी रस्त्यालगतच्या जागेचा वापर अतिक्रमणासाठी होत असल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाहेरगावाहून येणारे वाहनचालक रस्त्याच्या साइडपट्टीवर वाहने उभी करत असताना काही स्थानिक रहिवासी त्यांना मज्जाव करत असल्याची तक्रारही समोर आली आहे. त्यामुळे सार्वजनिक जागेचा वापर आणि वाहतुकीच्या नियोजनाबाबत संबंधित प्रशासनाने स्पष्टता आणण्याची गरज आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता करावी, मैलमिश्रित पाण्याच्या समस्येची तपासणी करून योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, तुटलेल्या चेंबरवरील ढापे तातडीने बसवावेत आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणांची पाहणी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वारंवार पाहणी होऊनही प्रत्यक्ष कामे पूर्ण होत नसतील, तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत. आता राहुरी खुर्द ग्रामपंचायत प्रशासन या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही कधी करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








