राहुरीतील ग्राहकाला लेखी सूचना; स्मार्ट मीटर बसविण्यास सहकार्य करण्याचे आवाहन
राहुरी | प्रतिनिधी दिनेश गायकवाड
महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असून, या कामासाठी सहकार्य न केल्यास संबंधित ग्राहकांना लेखी नोटीस बजावण्यात येत असल्याचे समोर आले आहे. राहुरी येथील एका वीजग्राहकाला स्मार्ट मीटर बसविण्यास सहकार्य करण्याबाबत २४ तासांची लेखी नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसमुळे परिसरातील वीजग्राहकांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
महावितरणच्या पत्रानुसार, केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत स्मार्ट मीटर तसेच टीओडी (Time of Day) मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.
नोटीसमध्ये विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५५, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे मीटरविषयक नियम तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वीजपुरवठा संहितेतील संबंधित तरतुदींचा संदर्भ देण्यात आला आहे. संबंधित ग्राहकाने मीटर बसविण्यास सहकार्य न केल्यास नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाऊ शकते, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, स्मार्ट मीटरमुळे वीजवापराचे रीडिंग घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणे, तसेच वीजवितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणे अपेक्षित आहे. मात्र, नवीन मीटर बसविण्याबाबत ग्राहकांच्या मनात असलेल्या शंका आणि गैरसमज दूर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्याची गरज
स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी ग्राहकांना त्याची कार्यपद्धती, वीजवापराचे रीडिंग, बिलिंग प्रक्रिया आणि मीटरचे फायदे याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना विश्वासात घेतल्यास स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत होऊ शकते.
महावितरणनेही ग्राहकांना नियमांनुसार स्मार्ट मीटर बसविण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून नियमांनुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.








