अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ ‘वृक्ष अंत्ययात्रा’; आप युवा आघाडी आक्रमक…
बातमी सम्राट | सुनिल एच गायकवाड | पिंपरी चिंचवड | दिनांक २३/१०/२०२६/
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालया शेजारी झालेल्या कथित बेकायदेशीर वृक्षतोडीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहर शाखा व महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) ‘वृक्ष अंत्ययात्रा’ आंदोलन करण्यात आले.
महापालिका मुख्यालयाशेजारील बांधकाम प्रकल्पासाठी ५२ पेक्षा अधिक जुन्या वृक्षांची संख्या व वय कागदपत्रांमध्ये कमी दाखवून वृक्षतोड केल्याचा आरोप आप युवा आघाडीने केला. तसेच वृक्ष प्राधिकरणाच्या अहवालात फेरफार केल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
संबंधित बांधकाम व्यावसायिक सुखवानी असोसिएट्स तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, बांधकाम परवानगी रद्द करावी आणि नियमानुसार १,०१८ झाडांसाठी प्रति वृक्ष १५ हजार रुपये याप्रमाणे सुमारे १ कोटी ५२ लाख ७० हजार रुपये वसूल करावेत, अशी मागणी करण्यात आली.
या प्रकरणात उद्यान अधीक्षक महेश गारगोटे आणि राजेश वसावे यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
“बांधकाम व्यावसायिक कितीही मोठा असला तरी तो कायद्यापेक्षा मोठा नाही. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी दिला.
या आंदोलनावेळी आम आदमी पार्टीचे सचिव अभिजीत मोरे, समन्वयक अमित मस्के, कामगार आघाडीचे संघटक संजय कोणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे, शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, पुणे शहराध्यक्ष धनंजय बनकर, युवक शहराध्यक्ष विकी पासोटे यांच्यासह सुरेश गायकवाड, अंकुश लांडगे, यशवंत कांबळे, लक्ष्मण माने, सुप्रिया गायकवाड, अजय सिंग, शुभम यादव, सुरेश बावनकर, सुभाष कारंडे, कुणाल गोरडे, राहुल मुदनोर, राहुल मदने, सुनिता काळे, कविता कोंडे, गौतम अडसूळ, अंकुश डोंगरे, गौतम तायडे, अखिल शेख, अंगद मुद्दे आणि सुरज झिटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.








