राहुरी : शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंदाची पर्वणी अनुभवली. या स्पर्धेत सौ. संजली परदेशी यांनी प्रथम क्रमांक पटकावत ई-बाईकचे पारितोषिक जिंकले. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या सौ. सप्रे यांना एलईडी टीव्ही, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या अर्चना धाडगे यांना इलेक्ट्रिक शेगडी, तर चतुर्थ क्रमांकाच्या राधिका खुळे यांना मिक्सर देऊन गौरविण्यात आले. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले.
राहुरी शहरातील विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रसिद्ध सिनेअभिनेते ओम यादव यांच्या खुमासदार आणि विनोदी शैलीतील सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात रंगत निर्माण झाली. तब्बल चार तास चाललेल्या या कार्यक्रमात महिलांनी विविध मनोरंजक खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला.
महिलांच्या आनंदासाठी हक्काचे व्यासपीठ
नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सौरभ उंडे यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील प्रत्येक घटकाला आनंद, सहभाग आणि आपलेपणाची अनुभूती देणारा उत्सव व्हावा, हा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे. महिलांना दैनंदिन जबाबदाऱ्यांतून काही क्षण विरंगुळा मिळावा, त्यांच्या आत्मविश्वासात वाढ व्हावी आणि त्यांच्यातील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘होम मिनिस्टर’सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
सामाजिक बांधिलकी जपणारे नाथ प्रतिष्ठान
नाथ प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची माहिती देताना सौरभ उंडे यांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, सर्वरोग निदान शिबिरे तसेच गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. सामाजिक सलोखा, माणुसकी आणि बंधुभाव जपत गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचे कार्य प्रतिष्ठान सातत्याने करीत आहे.
ओम यादव यांच्या मिश्कील संवादशैलीने, प्रश्नोत्तरांनी आणि विविध खेळांनी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्या मंदिर प्रशालेचे प्रांगण आनंदोत्सवाने गजबजून गेले.
पहाटे दोन वाजता पारितोषिक वितरण
या कार्यक्रमाला अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी पहाटे दीड वाजता उपस्थिती लावली. यावेळी नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौरभ उंडे यांनी त्यांचे स्वागत केले. मध्यरात्रीनंतरही कार्यक्रमातील उत्साह कायम होता. अखेर पहाटे दोन वाजता मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी साई आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजी कपाळे, संजीव उदावंत, नितीन काशिद, भारत भुजाडी, सचिन राऊत, मंदार धुमाळ, सचिन उंडे, लक्ष्मीकांत तनपुरे, वैभव धुमाळ, रामकृष्ण ढोकेणे, प्रसाद डाहळे, गोरक्षनाथ अडसुरे, गणेश खैरे, रितेश चौरसिया, सुवर्णा धनवटे, मुकुंद डहाळे, अक्षय उंडे, ओंकार कासार, प्रवीण ठोकळे, संदीप रासकर यांच्यासह नाथ प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.
नाथ प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे महिलांना मनोरंजनासोबतच आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आकर्षक पारितोषिकांमुळे ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम राहुरीतील नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण ठरला.








