मारोती एडकेवार ( जिल्हा प्रतिनिधी नांदेड ) नांदेड :बिलोली तालुक्यातील अटकळी येथील ज्येष्ठ नेते तथा बिलोली पंचायत समितीचे माजी सभापती प्रल्हाद पाटील मुंडकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अटकळी गावासह बिलोली तालुक्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.प्रल्हाद पाटील मुंडकर यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अटकळी ग्रामपंचायतीमध्ये तब्बल १५ वर्षे सरपंच व उपसरपंच म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. या प्रदीर्घ काळात गावातील विविध विकासकामे, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
गावाच्या विकासाच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणारे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. सरपंच व उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. त्यांच्या कार्यकाळातील अनुभवामुळे पुढील पिढीतील अनेक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळाले. यानंतर बिलोली पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण कृषी उत्पन्न बाजार समितीचे ही कार्य त्यांनी केले भागातील विविध प्रश्न व विकासकामांना त्यांनी प्राधान्य दिले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना सर्वसामान्य जनतेशी असलेली त्यांची नाळ कायम राहिली.ज्येष्ठ, अनुभवी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रल्हाद पाटील मुंडकर यांनी अटकळी गावासह परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
राजकीय क्षेत्रात कार्यरत असतानाही सर्वांशी आपुलकीने वागणे, ज्येष्ठांचा सन्मान करणे आणि तरुणांना मार्गदर्शन करणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.त्यांच्या निधनाने अटकळी गावाने १५ वर्षे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाची सेवा करणारे नेतृत्व आणि बिलोली पंचायत समितीचे अनुभवी माजी सभापती गमावले आहेत. त्यांच्या जाण्याने गावच्या सामाजिक व राजकीय जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून निघणे कठीण आहे. त्यांच्या कार्याच्या आठवणी अटकळी ग्रामस्थांच्या आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनात सदैव जिवंत राहतील. त्यांच्या निधनाने मुंडकर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








