नारंदीच्या तिरावरून ; नगरसुल येथे बसस्टॉप निवारा शेड रस्त्यावरील दिवे व पुलाची नागरिकांची मागणी
राजापूर प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
येवला तालुक्यातील नगरसुल गावाबाहेरील चिंचेच्या झाडाखाली असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसथांब्यावर प्रवाशांसाठी तातडीने निवारा शेड उभारण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे विशेषतः महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि प्रवाशांना ऊन वारा व पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने ही मागणी जोर धरत आहे. गावातील मुख्य रस्त्याचे सुमारे २० वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण झाल्यानंतर काही काळ एसटी बसेस पर्यायी मार्गाने धावत होत्या मात्र गावातील रस्त्यावर बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने आणि वाहतूक कोंडी यामुळे बसेस कायमस्वरूपी गावाबाहेरील मार्गानेच जाऊ लागल्या त्यामुळे गावाबाहेरील बसथांबा हा नागरिकांसाठी प्रमुख प्रवास केंद्र बनला आहे.
सध्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात महिला व विद्यार्थ्यांना भर पावसात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते तसेच पहाटे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अंधाराचा सामना करावा लागतो रस्त्यावर वीज खांब असूनही दिवाबत्तीची व्यवस्था नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावापासून बसथांब्यापर्यंत तातडीने पथदिव्यांची व्यवस्था करण्याचीही मागणी होत आहे. याशिवाय याच मार्गावरील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पुलाची आवश्यकता असून नागरिकांच्या सोयीसाठी येथे पूल उभारण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
नगरसुल ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून संबंधित प्रशासनाने बसस्टॉप निवारा शेड रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था आणि पुलाच्या उभारणीसाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया – विनोद पाटील
नगरसुल गावाबाहेरील चिंचेच्या झाडाखाली एसटीची वाट पाहणाऱ्या महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना दररोज ऊन वारा व पावसाचा सामना करावा लागतो ही परिस्थिती अत्यंत गैरसोयीची असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या ठिकाणी तातडीने बसस्टॉप निवारा शेड उभारण्यात यावा तसेच गावापासून बसथांब्यापर्यंत रस्त्यावर पथदिव्यांची व्यवस्था करावी आणि स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आवश्यक असलेला पूलही उभारावा हा कोणत्याही राजकारणाचा विषय नसून नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करावी हीच आमची अपेक्षा आहे.








