स्वातंत्र्यदिनी छत्रपती संभाजीनगरात धडाडल्या वैचारिक तोफा..
स्वातंत्र्यदिन आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधत संभाजीनगरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा वैचारिक जागर घडवून आणणारा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. रमणी प्रेझेंट्स व कवी आकाश आप्पा सोनवणे निर्मित ‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग आणि ‘देश आमचा देह आहे, तरी आम्ही बोलू नये’ हा वैचारिक कवितांचा कार्यक्रम रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सादर झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक आणि वैचारिक विश्वात ऐतिहासिक ठरला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. दिलीप महालिंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी, “हा केवळ नाट्यप्रयोग किंवा कवितांचा कार्यक्रम नसून हे वैचारिक प्रबोधन आहे,” असे प्रतिपादन केले. कलाविष्काराच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करण्याची आणि प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त करण्याची ताकद अशा कार्यक्रमांमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ या एकपात्री प्रयोगातून रमाईच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे अत्यंत प्रभावी दर्शन घडले. त्याग, संघर्ष, दुःख, कुटुंबाची जबाबदारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाला दिलेली खंबीर साथ या सगळ्यांचा वेध घेत रमाईच्या जीवनातील अनेक भावस्पर्शी क्षण रंगमंचावर जिवंत करण्यात आले. प्रा. रमणी बबिता आकाश यांच्या उत्कृष्ठ आणि प्रभावी अभिनयाने उपस्थित रसिक अक्षरशः भारावून गेले. त्यांच्या अभिनयातून रमाईची वेदना, ममत्व, त्याग आणि असामान्य धैर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचले.
त्याचबरोबर ‘देश आमचा देह आहे, तरी आम्ही बोलू नये’ या वैचारिक कवितांच्या कार्यक्रमाने सभागृहात विचारांचे वादळ निर्माण केले. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या परिवर्तनवादी आणि विद्रोही विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या कवितांनी सामाजिक वास्तवावर थेट भाष्य केले. अन्याय, विषमता, जातीयता, शोषण, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, लोकशाही आणि सामाजिक न्याय अशा विविध विषयांवर कवींनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून परखड भूमिका मांडली.
कवींच्या शब्दांनी उपस्थितांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली, प्रश्न उपस्थित केले आणि परिवर्तनाची गरज अधोरेखित केली. वैचारिक तोफांचा हा आवाज सभागृहाच्या भिंतींपलीकडे पोहोचत असल्याची अनुभूती उपस्थितांना आली. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नव्हे, तर प्रत्येक माणसाला समानता, प्रतिष्ठा, न्याय आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे, हा व्यापक संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे समोर आला.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभक्तीच्या पारंपरिक चौकटीपलीकडे जात स्वातंत्र्याच्या अर्थावर आणि सामाजिक जबाबदारीवर विचार करायला लावणारी वैचारिक मेजवानी संभाजीनगरकरांना मिळाली. विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, कवी, नाट्यकर्मी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात मोठा जनसमुदाय उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाच्या संयोजक प्रा. डॉ. रेखा मेश्राम आणि भारत शिरसाठ यांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजनापासून ते कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीपर्यंत त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
हा कार्यक्रम रसिकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा आणि छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक इतिहासात नोंद होणारा ठरला.








