दलितमित्र राजाभाऊ जाधव यांच्या “अगदी सहज म्हणून” पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी : रवींद्र मालुसरे
मुंबई : काही गोष्टी आपण ठरवून करत नाही. त्या नकळत घडत जातात आणि पुढे आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनून राहतात. वाचलेले जे आवडते त्याचा संग्रह आणि त्यानिमित्ताने लेखनही कदाचित असेच असते. मनात एखादा विचार येतो, एखादी घटना मनाला स्पर्शून जाते, एखादी व्यक्ती काहीतरी शिकवून जाते, वाचनाचे वेड असेल तर आवडलेली वाक्ये वहीत उतरवून ठेवण्याची सवय जडते आणि मग त्या अनुभवाला शब्द देण्याची इच्छा होते. त्यातूनच माझ्या चार पुस्तकांचा जन्म झाला. ‘अगदी सहज’ हे पुस्तकही अशाच सहज उमटलेल्या विचारांचे, अनुभवांचे आणि भावनांचे, जमवलेल्या कात्रणांचे संकलन आहे.
‘सहज’ हा शब्द दिसायला छोटा असला तरी त्यामध्ये जीवनाचे मोठे तत्त्व दडलेले आहे. माणूस मोठमोठ्या गोष्टींच्या शोधात असतो; पण त्याच्या आयुष्यातील खरे आनंद, दुःख, नाती, संघर्ष आणि आठवणी अनेकदा अगदी साध्या-सोप्या प्रसंगांत दडलेल्या असतात. त्या क्षणांकडे संवेदनशील नजरेने पाहिले, की त्यातून विचार जन्म घेतात आणि विचारांना शब्द मिळाले की साहित्य निर्माण होते. मनात आलेलं काही सांगायचं, जाणवलेलं काही लिहायचं आणि ते वाचकांपर्यंत पोहोचवायचं. आज याच नावाचे माझे वेगळे चौथे पुस्तक आज प्रकाशित होत आहे, ते मी माझे ज्येष्ठ बंधू रमण जाधव यांना वाढदिवसाची भेट म्हणून अर्पण करीत आहे. दलितमित्र तथा शिवसेना नेते राजाभाऊ जाधव यांच्या “अगदी सहज म्हणून” या पुस्तकाच्या चौथ्या भागाचे प्रकाशन नालासोपारातील समाज उन्नती मंडळाच्या सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सौ. विजया वनमाळी आणि सौ. राजश्री अवासंक यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला महापौर अजीव पाटील,प्राचार्य डाॅ.सखाराम डाखोरे,गाव कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वाळींजकर,समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष संजय वाळींजकर उपस्थित होते.
दिर्घ आजाराशी सामना करत असतानाही राजाभाऊंचा लेखनाचा,सामाजिक कार्याचा उत्साह पाहून आम्हाला प्रेरणा,उर्जा मिळते असे गौरवोद्गार यावेळी महापौर अजीव पाटील यांनी काढले. तर मागील तीन पुर्स्तकांप्रमाणे राजाभाऊंचे विचार वाचण्यासाठी आपण आतुर झालो असल्याचे प्रा.डाखोरे यांनी कथन केले.
राजाभाऊ पुढे असेही म्हणाले की, रमणभाऊ हे माझे थोरले बंधुच नव्हे तर माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक आहेत.त्यांच्यामुळेच माझी इथवर यशस्वी वाटचाल झाली आहे. या पुस्तकातून मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला नालासोपारा येथील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.








