रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांना अकोलेकरांची आदरांजली
(अशा दिग्गज चित्रकारांचे आदरांजलीच नव्हे तर दरवर्षी सोहळे व उपक्रम व्हायला हवेत – ज्येष्ठ कवी हिंमत ढाळे सर)
प्रतिनिधी : मिलिंद इंगळे
अकोला : दीनबंधू फोरम आणि अरियच्या संयुक्त विद्यमाने स्मृतिशेष रेखाचित्रकार मा. श्रीधर अंभोरे यांना अकोलेकरांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी रविवारी (दि. १६ ऑगस्ट) सायंकाळी अशोक वाटिका सभागृह, अकोला येथे ‘आदरांजली सभा’ आयोजित करण्यात आली. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी श्रीधर अंभोरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर, सामाजिक बांधिलकीवर तसेच त्यांच्या कलात्मक योगदानावर प्रकाश टाकत भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यामध्ये आकाशवाणी केंद्राचे माजी कार्यक्रम अधिकारी विजय दळवी, जेष्ठ आंबेडकरी कवी आ.की. सोनोने, तुळशीराम बोबडे, डॉ. कैलास वानखडे नंदू वानखडे, मिलिंद इंगळे मूर्तिजापूर, महादेव तायडे, आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मा. पी. जे. वानखडे होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. सुनील तायडे (प्रशासकीय अधिकारी) उपस्थित होते. प्रमुख मनोगत मा. सुरेश पाचकवडे (ज्येष्ठ साहित्यिक) यांनी व्यक्त केले. यावेळी मा. हिम्मत ढाळे (केंद्रीय अध्यक्ष, अंकुर साहित्य संघ), ज्येष्ठ कवी भगवंत तायडे आणि ज्येष्ठ कवी संजय डोंगरे यांनीही आपल्या मनोगतातून श्रीधर अंभोरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
वक्त्यांनी श्रीधर अंभोरे हे केवळ उत्तम रेखाचित्रकार नव्हते, तर समाजातील विविध प्रश्नांविषयी संवेदनशील असलेले कलावंत होते, असे नमूद केले. आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जाणीवा जागृत करण्याचे आणि सामान्य माणसाच्या भावविश्वाला अभिव्यक्ती देण्याचे काम केले. त्यांच्या जाण्याने कला व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या स्मृती आणि कलाविष्कार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्मृतिशेष श्रीधर अंभोरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक इंगळे यांनी केले. डॉ. मनोहर घुगे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली, तर डॉ. संजय पोहरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
श्रीधर अंभोरे यांच्या कलात्मक आणि सामाजिक योगदानाची आठवण जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आदरांजली सभेला साहित्य, कला, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच अंभोरे यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेसाठी ॲड. प्रजानंद उपर्वट, सिद्धार्थ तायडे, एस. बी. खंडारे, बाळाभाऊ दाभाडे, कवी-चित्रकार मिलिंद अवचित इंगळे, पत्रकार दिनेश डोंगरदिवे, कवी-गायक कल्पक कांबळे, पत्रकार प्रफुल भटकर आणि पत्रकार चंद्रमणी वानखडे हे उपस्थित होते








