जनतेच्या आशीर्वादाचे ऋण आयुष्यभर फेडता येणार नाही – आ. भीमराव केराम
प्रतिनिधी : मार्कंडेय सिरामवार
किनवट : “गेली चाळीस वर्षे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपल्या प्रेमाने, विश्वासाने आणि आशीर्वादाने जोपासले. जनतेने दिलेल्या या प्रेमाचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही,” असे भावनिक प्रतिपादन किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमरावजी केराम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात केले.
यावेळी बोलताना आ. केराम म्हणाले की, “सामाजिक प्रश्न हीच माझी समस्या” या भावनेतून आपण सातत्याने जनसेवेचे कार्य करीत आलो आहोत. वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस न राहता समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा व्हावा, या उद्देशाने विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आ. भीमरावजी केराम यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. महात्मे ट्रस्ट, नागपूर व संदेश भाऊ केराम सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्ररोग तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्यदूत अमन कुंडगीर तसेच संदेश भाऊ केराम सोशल फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे आ. केराम यांनी विशेष कौतुक करून आभार मानले. तसेच शिबिरात सेवा देणाऱ्या जनाई जीएनएम कॉलेज, किनवट येथील सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनींच्या सेवाभावी योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.
अभिष्टचिंतन सोहळ्यास मा. नगराध्यक्ष ईसा खान, नारायण सिडाम, व्यंकटराव नेमानीवार, बाबूराव केंद्रे, शिवराज राघूमामा, दिनकर दहीफळे, दादाराव टारपे, के. मूर्ती, निसार खान, रमण जायभाये, प्रतिक केराम, संदेश केराम, राजेंद्र केशवे, गोपु महामुने, रमेश बद्दीवार, प्रशांत रेड्डी यांच्यासह किनवट-माहूर तालुक्यातील भाजप तसेच सर्वपक्षीय मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आ. भीमरावजी केराम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व विकासात्मक कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








