लोकसेवा हक्काच्या फलकासाठी शेतकरी संघटनेचे ‘भीक मागो’ आंदोलन
“किनवट-माहूर तालुक्यातील तलाठी सज्जांवर फलक न लावल्याने प्रशासनाला २ सप्टेंबरपर्यंतची मुदत”
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरमवार
किनवट : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळावी, यासाठी किनवट व माहूर तालुक्यातील प्रत्येक तलाठी सज्जावर अधिसूचित सेवांची संपूर्ण माहिती देणारे फलक लावण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक व निर्धारित कालमर्यादेत मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ लागू केला आहे. मात्र किनवट व माहूर तालुक्यातील तलाठी सज्जांवर नागरिकांना उपलब्ध असलेल्या अधिसूचित सेवांची माहिती देणारे फलक लावण्यात आलेले नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
प्रत्येक तलाठी कार्यालयात उपलब्ध सेवा, आवश्यक कागदपत्रे, सेवाशुल्क, सेवा मिळण्याची निर्धारित कालमर्यादा, तलाठी कार्यालयात उपस्थित राहण्याचे दिवस व वेळ, तसेच सेवा वेळेत मिळाली नाही तर प्रथम व द्वितीय अपील कुठे करावे, यासह संबंधित अधिकाऱ्यांची माहिती देणारा फलक लावणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी आखलेल्या धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी न होणे ही बाब गंभीर असून, संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांच्या स्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणीही रमेश कदम पाटील यांनी केली आहे.
“फलक लावण्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध नसेल तर शेतकरी संघटना गावोगावी ‘भीक मागो आंदोलन’ करून निधी जमा करेल आणि शासनाला फलक लावण्यासाठी पैसे देईल,” असा उपरोधिक इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, सर्व तलाठी सज्जांवर माहिती फलक लावण्यासाठी प्रशासनाला २ सप्टेंबर २०२६पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कार्यवाही न झाल्यास २ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय, किनवट येथे शेतकरी संघटनेच्या वतीने भजन मोर्चा व ‘भीक मागो आंदोलन’ करण्यात येणार असल्याचा इशारा रमेश कदम पाटील यांनी दिला आहे.
हे आंदोलन कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक विरोधात नसून, नागरिकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती मिळावी आणि शासकीय सेवा पारदर्शकपणे उपलब्ध व्हाव्यात, या मागणीसाठी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.








