दरोड्याचा गुन्हा चौथ्या दिवशी उघड; सहा आरोपींना अटक
राहुरी पोलिसांची कारवाई; रोख रक्कम, टॅब, दोन दुचाकींसह कागदपत्रे जप्त
प्रतिनिधी : प्रमोद डफळ
राहुरी : दि. १९ ऑगस्ट, राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडदे आखाडा शिवारात राहुरी-मल्हारवाडी रोडवर झालेल्या दरोड्याचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या चौथ्या दिवशी उघडकीस आणला. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, सॅमसंग कंपनीचा टॅब, दोन मोटारसायकली तसेच फिर्यादीची कागदपत्रे व इतर साहित्य जप्त केले आहे. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास श्रीकांत संतोष पोपळघट हे गडदे आखाडा शिवारातून जात असताना पाच ते सहा इसमांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील रोख रक्कम व टॅब हिसकावून घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
याप्रकरणी पोपळघट यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९०८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(१), ३१०(२) व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक तपास तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शंकर भाऊसाहेब माळी (रा. बारगाव नांदूर), शिवाजी लक्ष्मण बर्डे (रा. ताहराबाद), बाबू संजय वाघ (रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर), ऋतिक दिलीप बर्डे (रा. ताहराबाद), संतोष शांताराम बर्डे (रा. ताहराबाद) आणि दाद्या उर्फ नवनाथ भाऊसाहेब बर्डे (रा. ताहराबाद)) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले.
त्यानंतर तपास पथकाने राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीसह आरोपींच्या संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबवून सहाही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून शिताफीने ताब्यात घेतले.
मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून ८ हजार ६० रुपयांची रोख रक्कम, अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅब, दोन मोटारसायकली, फिर्यादीची चोरीस गेलेली कागदपत्रे व इतर साहित्य जप्त केले आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
आरोपींकडे अधिक तपास सुरू असून, गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेले साहित्य तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, राजेंद्र नागरगोजे, प्रवीण बागुल, राहुल यादव, चालक पोलीस हवालदार शकूर सय्यद, जहीर शेख, पोलीस अंमलदार प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजने, नदीम शेख व अंकुश भोसले यांनी सहभाग घेतला. तसेच श्रीरामपूर मोबाईल सेलचे पोलीस हवालदार सचिन धनाड व संतोष दरेकर यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास पथकाला मदत केली.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करीत आहेत.








