हत्तींच्या बंदोबस्तासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक..!
उपवनसंरक्षक कार्यालयाला घेराव; शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसह ठोस उपाययोजनांची मागणी
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
गडचिरोली : देसाईगंज (वडसा), जि. गडचिरोली : देसाईगंज तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जंगली हत्तींच्या कळपाने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींच्या उपद्रवामुळे शेतीपिकांचे तसेच शेतघरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, या गंभीर प्रश्नाकडे वनविभागाचे अपेक्षित गांभीर्याने लक्ष नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अ. प. गट) वतीने करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ. प. गट), तालुका देसाईगंज (वडसा) यांच्या वतीने मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता उपवनसंरक्षक, वडसा कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व कार्यकारी जिल्हाध्यक्ष मा. नंदूभाऊ नरोटे आणि तालुकाध्यक्ष मा. पिंकूभाऊ बावणे यांनी केले.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या घेराव आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. रविन्द्र वासेकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. मोहम्मद यूनुस शेख, युवती जिल्हाध्यक्ष मा. कु. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा उपाध्यक्ष मा. जेसा भाऊ मोटवानी, जिल्हा संघटन सचिव मा. अब्दुल लतीफ शेख, जिल्हाध्यक्ष – सांस्कृतिक आघाडी मा. रियाज़ुल शब्बीर शेख, जिल्हा सरचिटणीस मा. संजय साळवे, शहराध्यक्ष मा. हरिष मोटवानी, तसेच मा. विलास गोटेफोडे, मा. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्याची मागणी चिखलीरीट, चिकलीतुकूम, हळबी डोंगरगाव, पिंपळगाव-पळसगाव, कसारी, रावणवाडी टोली, भगवानपूर आदी परिसरात जंगली हत्तींच्या कळपामुळे झालेल्या शेतीपिकांच्या तसेच मालमत्तेच्या नुकसानीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
तसेच परिसरात वावरत असलेल्या सुमारे ३५ जंगली हत्तींच्या कळपाचा तातडीने सुरक्षित बंदोबस्त करून त्यांना जंगलाच्या दिशेने सुरक्षितपणे हलविण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
हत्तींच्या वारंवार होणाऱ्या उपद्रवामुळे निर्माण झालेला शेतीपिकांच्या नुकसानीचा प्रश्न केवळ तात्पुरत्या उपायांनी न सोडविता, त्यावर कायमस्वरूपी आणि शास्त्रीय स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून शेतकरी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, वनविभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन व मदत मिळावी तसेच वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य मोबदला मिळावा, अशी मागणीही आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
दरम्यान, उपवनसंरक्षक, वडसा कार्यालयातील कथित निष्क्रियता आणि भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.
“ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू”
जंगली हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या जीवितासह शेती आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी आणि हत्तींच्या समस्येवर ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
प्रशासनाकडून या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घेण्यात न आल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण, नागरिकांची सुरक्षितता आणि वन्यजीवांचे संवर्धन – या तिन्ही बाबींमध्ये संतुलन साधणारी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज या आंदोलनातून अधोरेखित झाली आहे.








