दहा कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद
किनवट प्रतिनिधी – मार्कंडेय सिरमवार
किनवट : दि. २१ ऑगस्ट २०२६, नशामुक्त आणि निरोगी भारताच्या निर्मितीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘दहा कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियाना’ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातून ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा देणे, युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि कुटुंब व समाजाच्या आरोग्यपूर्ण भविष्यासाठी सामूहिक संकल्प घडविणे हा आहे. विविध राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये, सेवा केंद्रे, सार्वजनिक ठिकाणे व तसेच किनवट येथील सरस्वती महाविद्यालय मध्ये सुद्धा व देशभरामध्ये अनेक संस्थांमध्ये प्रतिज्ञा व जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
अभियानात सहभागी नागरिक स्वतः नशामुक्त जीवन जगण्याचा, कुटुंबीय व मित्रांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करण्याचा आणि निरोगी व आनंदी समाजनिर्मितीत योगदान देण्याचा संकल्प घेत आहेत.
नशेचे दुष्परिणाम केवळ व्यक्तीच्या आरोग्यापुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्याचा परिणाम कुटुंब, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक जीवनावरही होतो. त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक विचार, शिस्त, योग-ध्यान आणि मूल्याधारित जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन विविध जनजागृती कार्यक्रमांतून करण्यात येत आहे.
‘नशामुक्त भारत-सशक्त भारत’ या संकल्पनेला व्यापक लोकसहभाग मिळवून देत दहा कोटी नागरिकांपर्यंत नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा या महाअभियानाचा प्रयत्न आहे.








