१०० खाटांचे रुग्णालय अन् धोकादायक विद्युत तारांचा प्रश्न समितीसमोर ; नगरध्यक्ष फिरोज दोसानी यांचे निवेदन
प्रतिनिधी : अंबादास मुकटे
माहूर : श्रीक्षेत्र माहूरच्या सर्वांगीण विकासासह नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माहूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने माहूर येथे सध्या ग्रामीण रुग्णालय असून गंभीर आजार, अपघात व आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना इतर शहरांकडे हलवावे लागते. त्यामुळे माहूर येथे प्रस्तावित ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाऐवजी १०० खाटांचे सर्वसुविधायुक्त शासकीय उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली. रुग्णालयात आयसीयू, ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक प्रयोगशाळा, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, ट्रामा केअर व आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विशेषज्ञ डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व आवश्यक मनुष्यबळ मंजूर करावे, अशी मागणीही करण्यात आली.
माहूर येथे सध्या उपलब्ध असलेली डायलिसीस सेवा शासनामार्फत कायमस्वरूपी सुरू करावी, रुग्णालयासाठी सुसज्ज इमारत, वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा व रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.या शहरातील जीर्ण व धोकादायक विद्युत तारांचाही प्रश्न समितीसमोर मांडण्यात आला. माहूर शहरातील पथदिव्यांच्या खांबांवरील विद्युत तारा अनेक ठिकाणी लोंबकळत असून नागरिक व दुकानदारांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात वारा व पावसामुळे या तारांमधून विद्युत प्रवाह घरांमध्ये किंवा दुकानांमध्ये उतरण्याचा धोका असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. शहरातील अनेक विद्युत तारा सुमारे ७० वर्षांपासून वापरात असल्याने त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या तारा तातडीने बदलून नवीन बंधिस्त केबलद्वारे विद्युत व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
माहूरच्या धार्मिक महत्त्वासोबतच तालुक्यातील नागरिकांची आरोग्याची गरज आणि शहरातील नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन या दोन्ही प्रश्नांवर शासन स्तरावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केली.यावेळी उपनगराध्यक्ष नाना लाड, नगरसेवक प्रतिनिधी आकाश कांबळे, अपसर अली, सुमित खडसे व आशु पठाण उपस्थित होते.








