किनवट येथे अनुसूचित जमाती कल्याण समितीकडे विविध मागण्यांचे निवेदन
प्रतिनिधी : सतिश घुले
किनवट : आज किनवट येथे अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा. आमदार श्री. दौलतरावजी दरोडा साहेब यांची भेट घेऊन किनवट तालुक्यासाठी खालील निवेदन दिली, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्र शाखेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत निवेदने सादर करण्यात आली.
यावेळी पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
नांदेड जिल्ह्यात पेसा अंतर्गत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्यात यावे, किनवट येथील जात पडताळणी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले असून ते पुन्हा किनवट येथे सुरू करण्यात यावे, एसआयटी समितीच्या अहवालाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, ग्रामपंचायत सिंगारवाडीला विकास निधी व विकासकामे का मिळाली नाहीत, याबाबत चौकशी करण्यात यावी,पंचायत समितीमध्ये काही अधिकाऱ्यांकडून सरपंच व उपसरपंच यांचा अपमान तसेच कमिशनची मागणी होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यात यावी, आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय, किनवट यांच्याकडून विकासकामांचे समान वाटप होत नसल्याबाबत चौकशी करून सर्व गावांना समान न्याय देण्यात यावा, प्रकल्प कार्यालयामध्ये दिनांक 30/03/2023 रोजी झालेल्या प्रशासकीय मान्यतेतील अनियमिततेची चौकशी करण्यात यावी,पंचायत समिती किनवटकडून सुमारे 2,000 घरकुल लाभार्थी कुटुंबांना मागील दोन वर्षांपासून पहिला हप्ता मिळालेला नसल्याबाबत तसेच दुसरा व तिसरा हप्ता प्रलंबित असल्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजनेतून किनवट तालुक्यातील ग्रा प ला रस्ते, नाल्या व बंधाऱ्यांची विकासकामे मंजूर करण्यात यावीत, आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर मा. दौलतरावजी दरोडा साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
आदिवासी समाजाच्या या सर्व मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय होऊन सर्व प्रश्न मार्गी लागतील असे आस्वासन आदिवासी जमाती कल्याण समिती कडून देण्यात आले.








