अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांचे किनवट येथे आ.भीमराव केराम यांच्या हस्ते सत्कार
प्रतिनिधी -मार्कंडेय सिरामवार
किनवट : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष मा. ना. आ. दौलतराव दरोडा तसेच समिती सदस्य आ. शांताराम मोरे, आ. उमाताई खापरे, आ. मंजुळाताई गावित आणि आ. हिरामण खोसकर यांनी आज किनवट येथे आमदार श्री. भीमराव केराम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार श्री. केराम यांनी समिती अध्यक्ष व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत यथोचित सत्कार केला.
या प्रसंगी बाबुराव केंद्रे, आनंद मच्छेवार, श्रीनिवास नेमानीवार, दत्ता आडे, स्वागत आयनेनीवार, डॉ. उत्तम धुमाळे, दादाराव तारपे, तुकाराम पेंदोर, नीलकंठ कातले, प्रकाश कुडमेथे, विश्वनाथ नखाते, भारत हातामोडे, बंटी फड, संतोष मरसकोल्हे, गुलाबराव मडावी, बालाजी सिडाम, हर्षदीप कनाके, रमेश बद्दीवार, बाळकृष्ण कदम, बब्बू तकलवार, जगदीश रेड्डी, अनिल तुमराम, शाम पिल्लेवार, दत्ता भिसे, सुरज पाटील, नागनाथ गेडाम, रामकिशन मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
विधानसभेतील सहकारी सदस्य या नात्याने आमदार भीमराव केराम यांनी समितीच्या मान्यवर सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाजाच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, वनहक्क, पायाभूत सुविधा तसेच इतर विविध विकासविषयक प्रश्नांबाबत समितीचे लक्ष वेधण्यात आले.
तसेच दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी विकास विभागाने शासकीय आदिवासी वसतिगृहांसंदर्भात निर्गमित केलेल्या सुधारित शासन निर्णयातील काही त्रुटी व त्यातून विद्यार्थ्यांवर होणारे संभाव्य परिणाम याबाबतही समिती सदस्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर शासन निर्णयातील उणीवा दूर करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी स्थानिक आदिवासी बांधवांनी समिती सदस्यांना विविध प्रलंबित मागण्यांची निवेदने सादर केली. आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याबाबत समिती सदस्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








