सरदार सर्वाई पापन्ना गौड यांच्या 376 व्या जयंती सोहळ्यानिमित्त आ. भीमराव केराम यांना निमंत्रण
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरमवार
किनवट: कलाल गौड तेलंग समाजाचे आराध्य दैवत, महान स्वातंत्र्यवीर व लोकनायक सरदार सर्व्हाय पापन्ना गौड यांची 376 वी जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून आयोजकांच्या वतीने किनवटचे आमदार भीमराव जी केराम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे स्नेहाचे निमंत्रण देण्यात आले.
हा भव्य जयंती सोहळा रविवार 23 ऑगस्ट 2026 रोजी मौजे मलकागुडा ता. माहूर, जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
आमदार भीमराव केराम यांना निमंत्रण देताना कलाल गौड तेलंग समाज किनवट तालुका अध्यक्ष श्री विजय कन्नलवार यांच्या नेतृत्वात समाजबांधव उपस्थित होते. या वेळी विष्णूजी पडलवार, नितीन कन्नलवार, सचिन पडलवार, बळीराम मुरगुलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार केराम यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करावे, अशी विनंती निमंत्रण पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
17 व्या शतकातील महान योद्धा सरदार पापन्ना गौड यांनी मुघल सत्तेविरुद्ध लढा देत वंचितांच्या हक्कासाठी मोठे कार्य केले. त्यांच्या या शौर्यगाथेचे स्मरण करण्यासाठी सरदार सर्व्हाय पापन्ना गौड उत्सव समिती, मलकागुडा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
किनवट व माहूर तालुक्यातील सर्व कलाल गौड तेलंग समाज बांधवांनी या 376 व्या जयंती सोहळ्यास मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन उत्सव समिती व समस्त कलाल गौड तेलंग समाज, मलकागुडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.








