श्रावणात देवदर्शनासाठी दहिवडी आगाराने विशेष एसटी पॅकेज सुरू करावे
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या विशेष बसफेऱ्या सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
प्रतिनिधी : सचिन सरतापे
म्हसवड : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध देवस्थाने व तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. माण तालुक्यातील अनेक भाविकांना खासगी वाहनांचा मोठा खर्च परवडत नसल्याने दहिवडी एसटी आगाराने श्रावण विशेष देवदर्शन पॅकेज सुरू करून महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून ठरावीक दिवसांचे ‘श्रावणातील देवदर्शन’ विशेष पॅकेज तयार करून त्यामध्ये प्रवास, परतीचा प्रवास आणि शक्य असल्यास निवासाची माहिती एकत्रित उपलब्ध करून दिल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला, कुटुंबे तसेच ग्रामीण भागातील भाविकांना मोठा फायदा होऊ शकतो.
या प्रमुख देवस्थाने पॅकेजमध्ये समाविष्ट करण्याची मागणी
माण तालुक्यातून विविध मार्गांवर विशेष देवदर्शन फेऱ्या नियोजित करून पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तुळजापूर श्री तुळजाभवानी मंदिर, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर, गाणपतीपुळे श्री गणपती मंदिर, महाबळेश्वर, कोल्हापूर श्री महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, नृसिंहवाडी, औदुंबर, नरसोबाची वाडी, शिर्डी श्री साईबाबा मंदिर, नाशिक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, सप्तशृंगी गड, शनी शिंगणापूर, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, महूर रेणुका माता, शेगाव श्री गजानन महाराज, अष्टविनायक गणपती मंदिरे यांचा समावेश करावा, अशी मागणी आहे.
तसेच मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव या अष्टविनायक तीर्थक्षेत्रांसाठी स्वतंत्र दोन अथवा तीन दिवसांचे पॅकेज तयार करता येऊ शकते. याशिवाय आळंदी, देहू, पैठण, कारंजा लाड, माहूर, अंबाजोगाई, जेजुरी,, म्हसवड सिद्धनाथ गोंदवले, शिखर शिंगणापूर, औंध येथील यमाई मंदिर आणि माण तालुक्यातील प्रमुख देवस्थाने यांनाही स्थानिक पॅकेजमध्ये समाविष्ट करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
‘लालपरीसोबत देवदर्शन’ ठरावे आकर्षण
दहिवडी आगाराने मागणीचा विचार करून ‘श्रावणातील देवदर्शन – लालपरीसोबत’ अशा संकल्पनेतून विशेष बसफेऱ्या सुरू केल्यास एसटीला उत्पन्न मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील भाविकांना सुरक्षित आणि तुलनेने परवडणाऱ्या दरात तीर्थयात्रा करता येईल.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कुटुंबांसाठी सवलतीच्या दरात पॅकेज, ऑनलाइन/आगारात आगाऊ आरक्षण, ठरावीक ठिकाणी भोजन व विश्रांतीची व्यवस्था आणि परतीची निश्चित वेळ अशी सुविधा दिल्यास या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
श्रावण महिना संपण्यापूर्वी दहिवडी आगाराने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन माण तालुक्यातून महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या विशेष एसटी बसफेऱ्या आणि देवदर्शन पॅकेजची घोषणा करावी, अशी जोरदार मागणी भाविक व प्रवाशांमधून होत आहे.








