शिरसाटवाडीत काल भैरवनाथ देवस्थान ट्रस्टची नवी कार्यकारिणी; फलकाचे दिमाखात उद्घाटन
प्रतिनिधी : मधुकर केदार
शिरसाटवाडी : पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील ग्रामदैवत श्री काल भैरवनाथ देवस्थान ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सज्ज झाली असून, या कार्यकारिणीच्या बोर्डाचे उद्घाटन ह.भ.प. काशिनाथ महाराज व माजी सभापती अर्जुनराव शिरसाट यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व भाविकांची उपस्थिती होती.
माजी सभापती अर्जुनराव शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान ट्रस्टची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. देवस्थानच्या धार्मिक परंपरेबरोबरच आगामी काळात देवस्थानच्या विकासाला अधिक चालना देण्याची जबाबदारी या नवीन विश्वस्त मंडळावर सोपविण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी जनार्दन भानुदास शिरसाट, उपाध्यक्षपदी अनंत राजे कराड, सचिवपदी गोरक्ष महादेव शिरसाट (मेजर), तर खजिनदारपदी भानुदास रामचंद्र शिरसाट यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच विश्वस्त म्हणून महेंद्र सहदेव शिरसाट, अक्षय अर्जुनराव शिरसाट, डॉ. बाळासाहेब दशरथ शिरसाट, पोपट पांडुरंग शिरसाट, भीमराव छगन शिरसाट, सुधीर पंढरीनाथ महाजन आणि रामनाथ बाबासाहेब खाडे यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन विश्वस्त मंडळाने देवस्थानच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. काल भैरवनाथ देवस्थानच्या लौकिकाला साजेसे धार्मिक, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊ, असा विश्वास विश्वस्त मंडळाने व्यक्त केला.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून देवस्थानच्या कारभाराला अधिक शिस्तबद्ध दिशा मिळण्यासोबतच भाविकांच्या सुविधा आणि देवस्थानच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, नूतन विश्वस्त मंडळाच्या वतीने ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. ग्रामस्थांनी नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाचे अभिनंदन करून श्री काल भैरवनाथ देवस्थानच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.








