रेल्वेचे पत्र्याचे कंपाऊंड काढा ; स्मशानभूमी व दफनभूमीकडे जाणारा मार्ग खुला करा !
खासदार श्रीरंग बारणे यांची मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी
प्रतिनिधी : रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड : फुगेवाडी–कुंदननगर परिसरातील हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीकडे जाणारा पूर्वीचा मार्ग रेल्वे विभागाने पत्र्याचे कंपाऊंड उभारून बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने उभारलेले पत्र्याचे कंपाऊंड तातडीने काढून टाकावे आणि नागरिकांसाठी पूर्वीचा मार्ग खुला करावा, अशी ठाम मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.
फुगेवाडी–कुंदननगर परिसरात सुमारे १२ ते १४ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. परिसरातील नागरिकांच्या अंत्यविधीसाठी हिंदू स्मशानभूमी तसेच मुस्लिम समाजासाठी दफनभूमी उपलब्ध आहे. मात्र, रेल्वे विभागाने परिसराच्या दोन्ही बाजूंना पत्र्याचे कंपाऊंड उभारल्यामुळे स्मशानभूमी व दफनभूमीकडे जाणारे पूर्वीचे मार्ग बंद झाले आहेत.
अंत्यविधीच्या वेळी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबीय, नातेवाईक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंत्यविधीसाठी जाणारा मार्ग हा कोणत्याही धर्माच्या नागरिकांसाठी अत्यंत संवेदनशील आणि मूलभूत मानवी गरजेचा विषय आहे. त्यामुळे या मार्गावर निर्माण झालेला अडथळा तातडीने दूर करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक श्री. कृश किशोर मिश्रा, पुणे रेल्वे व्यवस्थापक श्री. राजेश कुमार वर्मा, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक श्री. प्रभात कुमार, प्रधान मुख्य अभियंता श्री. रजनीश मथुर तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. भुवनीय कुमार गुप्ता यांच्याकडे नागरिकांच्या या गंभीर समस्येबाबत मागणी केली.
रेल्वेने उभारलेले पत्र्याचे कंपाऊंड काढून पूर्वीचा नागरिकांचा मार्ग तातडीने खुला करावा. आवश्यक असल्यास सुरक्षित व कायमस्वरूपी प्रवेशमार्गाची व्यवस्था करावी. तसेच रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून नागरिकांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि विलंब न करता सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
यावेळी युवासेना शहर संघटक निलेश हाके, रेल्वे बोर्ड सदस्य सुदर्शन देसले तसेच फुगेवाडी–दापोडी परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.
नागरिकांच्या अंत्यसंस्काराच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतल्याने या प्रश्नावर रेल्वे प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.








