तहसीलदार, पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी; अवैध व्यवसायांप्रकरणी पालकमंत्र्यांना सुभाष पुरी यांचे साकडे
अवैध धंद्यांना संबंधित अधिकाऱ्यांचे अभय असल्याचा आरोप; चौकशी करून निलंबनाची मागणी
राहुरी (प्रतिनिधी) : राहुरी व लोणी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यात संबंधित प्रशासकीय व पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुभाष पुरी यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची अथवा सेवेतून बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुरी यांनी लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, राहाता तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी, तसेच राहुरीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे परिसरात अवैध व्यवसायांना चालना मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रवरा नदीकाठच्या परिसरात अवैध वाहतूक व विक्री सुरू असल्याचा दावा
लोणी-प्रवरा परिसर तसेच राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या भागात अवैध दारू, वाळू वाहतूक आणि इतर बेकायदा व्यवसाय सुरू असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. संक्रापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर दारू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या गुळाचा साठा करण्यात आल्याचा, तसेच त्याची वाहतूक व विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंगापूर परिसरात रस्त्यालगत शेड उभारून रात्रंदिवस अवैध दारू विक्री सुरू असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
चिंचोली परिसरातून दिवसाढवळ्या वाळू वाहतूक सुरू असल्याचा, तर कोल्हार व रामपूर परिसरातूनही रात्रंदिवस अवैध वाळू वाहतूक होत असल्याचा आरोप पुरी यांनी केला आहे.
‘हप्ते वसुली’चा गंभीर आरोप
या अवैध व्यवसायांमधून संबंधित पोलीस व महसूल यंत्रणेकडून दरमहा मोठ्या प्रमाणावर हप्ते वसूल केले जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृतपणे पुष्टी झालेली नसून, त्याबाबत चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अवैध व्यवसायांमुळे प्रवरा नदीकाठच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कथित तस्करांच्या दहशतीखाली नागरिकांना जीवन जगावे लागत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणांची चौकशी करण्याची मागणी पुरी यांनी केली आहे.
स्थानिक पुढाऱ्यांच्या नावाचा गैरवापर?
अवैध व्यवसाय करणारे काही जण स्थानिक पुढाऱ्यांची नावे सांगून नागरिकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि अवैध व्यवसायांना आळा घालावा, अशी मागणी सुभाष पुरी यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.








