टाकळीभान येथे एफ.डी.ए.ची धडक, भेसळखोरांनी घेतली धास्ती; पथकाची खाद्यतेलावर करडी नजर
प्रतिनिधी : संदीप जाधव
टाकळीभान : राज्यभर अन्न औषध प्रशासनाची भेसळखोरांवर कारवाई सुरु असल्याने गुरुवारी सायंकाळी अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने टाकळीभान येथे धडक मारली. एफ.डी.ए.चे पथक आल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने बाजार पेठेतील बहुसंख्य व्यावसायीकांनी दुकानचे “शटर बंद” करुन दुकानातुन निघुन जाणे पसंत केले.
श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान अन्न औषध प्रशासनाच भेसळ तपासणीचे पथक आल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. पथक दुकानांमधून विविध खाद्यपदार्थांचे नमुने घेवुन तपासणी करुन कारवाई होणार असल्याच्या भीतीने आपापली दुकाने बंद करून तेथून निघून जाणे पसंत केले.
काही ठिकाणी तपासणी अथवा कारवाई सुरू असल्याची माहिती पसरल्याने नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली. संबंधित पथकाला पाहण्यासाठी गावातील विविध चौकांमध्ये नागरिकांची गर्दी झाल्याचे सांगण्यात येते. काही व्यावसायिकांच्या दुकानांच्या बोर्डवरून मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना फोन करुन संपर्क साधल्याचीही माहीती पुढे आली आहे. या प्रकारामुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अन्न सुरक्षा व भेसळ प्रतिबंधक नियम, तपासणीदरम्यान आवश्यक असलेली कागदपत्रे आणि तपासणीची प्रक्रिया याबाबत पुरेशी माहिती नसल्याने कारवाई होईल या भीतीपोटी काही व्यावसायिकांनी शटर डाऊन करुन धुम ठोकली. मात्र ज्या ठिकाणी या पथकाने भेट दिली ते बाजारपेठेपासुन दुर असल्याने व पथक सुमारे तीन तास त्या परीसरातच असल्याने त्याबाबतचा अधिकृत तपशिल मिळु शकला नाही. काही दिवसांपूर्वी टाकळीभान गावात महावितरणचे पथक आले असताना अन्न औषध प्रशासनाचे पथक आल्याची अफवा पसरल्याने अशाच प्रकारची धांदल व्यवसायिकांची उडाली होती.
त्यामुळे यावेळीही रात्री उशिरा तपासणी पथक आल्याची माहिती पसरल्यानंतर नागरिक व व्यावसायिकांमध्ये पुन्हा चर्चा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. पथक नेमके कोणत्या विभागाचे आहे ? तपासणीचा उद्देश काय आहे ? आणि कोणत्या नियमांतर्गत तपासणी केली जात आहे ? याची अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यावरच या प्रकरणाचे नेमके चित्र स्पष्ट होणार असले तरी व्यवसायिकांनी मात्र या पथकाचा चांगलाच धसका घेतला आहे.








