८ सप्टेंबरला ब्रह्मपुरीत ‘दे धडक बैलगाडी-ट्रॅक्टर मोर्चा’ तर १ सप्टेंबरला ‘चलो दिल्ली’ची हाक
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करणार गांगलवाडी येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेचा शेतकरी निर्धार मेळावा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
चंद्रपूर : (ब्रह्मपुरी) शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि विविध ज्वलंत समस्यांवर आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, शाखा ब्रह्मपूरीच्या वतीने २२ ऑगस्ट २०२६ रोजी मौजा गांगलवाडी येथील ग्रामपंचायत सभागृहात ‘शेतकऱ्यांचा निर्धार मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.
मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य तथा महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष डॉ. महेश कोपुलवार, भाकपचे आरमोरी येथील माजी नगरसेवक अॅड. जगदीश मेश्राम आणि चंद्रपूर किसान सभेचे जिल्हा सचिव कॉम्रेड विनोद झोडगे पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून शेतकरीविरोधी धोरणांवर सडकून टीका करत हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.
मेळाव्यात मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या सन २०२५-२६ चा शेतकऱ्यांना हेक्टरी २०,००० रुपये थकीत बोनस त्वरित देण्यात यावा. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २,००,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ वितरित करावे. सर्व जबरानजोत धारकांना जमिनींचे पट्टे वाटप करून त्वरित ७/१२ द्यावा. सर्व महिला बचत गटांचे बँका व मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज पूर्णतः माफ करावे. गोसेखुर्द उजव्या कालव्याचे पाणी ब्रह्मपुरी विभागातील सर्व शेतकऱ्यांना पुरवावे. स्मार्ट मीटर / टीओडी मीटर रद्द करून वीज दरवाढ तत्काळ मागे घ्यावी. शेतकऱ्यांनी अनुदानावर घेतलेल्या ट्रॅक्टरची १,२५,००० रुपये सबसिडी बँक खात्यात तात्काळ जमा करावी. नमो शेतकरी महासन्मान योजनेचे प्रलंबित हफ्ते तातडीने जमा करण्यात यावेत. आगामी आंदोलनाची हाक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या ८ सप्टेंबर रोजी ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालयावर भव्य ‘दे धडक बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १ सप्टेंबर रोजी संसदेवर धडकणाऱ्या ‘बदलाव जरूरी है! चलो दिल्ली’ या आक्रोश मोर्चातही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कॉ. विनोद झोडगे पाटील यांनी केले.
या मेळाव्याला सुनील शेंडे, मधुकर चौधरी, सुनील म्हशाखेत्री, ईश्वर ठाकरे, अमोल मानापुरे, लोमेश मेश्राम, प्रमोद सातपुते, विनोद पाटील, राजेश्वर मगरे, गोलू दरवे, चुनीलाल मोटघरे, प्रशांत खोब्रागडे, आनंदराव भोयर, यश नंदनवार यासह गांगलवाडी, मुडझा, मेंडकी, निलज परिसरातील शेकडो शेतकरी, शेतमजूर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








